'आमचे खास बंधू..' म्हणत उदयनराजेंकडून शिवेंद्रसिंहराजेंचं कौतुक; संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 28 January 2021

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे-शिवेंद्रराजेंचं बंधूप्रेम उफाळून आलं होतं, त्यानंतर दोन्ही बंधूंनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपात प्रवेश केला होता.

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे बंधूप्रेम महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे शिवेंद्रराजेंचं बंधूप्रेम उफाळून आलं होतं, त्यानंतर दोन्ही बंधूंनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळीच दोन्ही राजेंच्या मनोमीलनावर शिक्कामोर्तब झाला होता, या दोन्ही राजेंच्या वादात दस्तुरखुद्द शरद पवारांनी देखील मनोमीलन घडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे दोन्ही राजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला, तेव्हापासून या दोन्ही राजांमध्ये 'बंधूप्रेम' उफाळत गेले, आज त्याची प्रचितीही उदयनराजेंच्या भाषणातून पहायला मिळाली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले एकाच व्यासपीठावर आले होते. दरम्यान, या कार्यक्रमास खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी 'मराठा समाजाला दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही', असं उदयनराजे यांनी स्पष्ट केले. साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचं उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर पाहण्यास मिळाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजेंनी आपली रोखठोक भूमिका मांडत प्रशासनाला धारेवर धरले.

...यांना कूठली भाषा कळती तेच समजेना; उदयनराजे साता-यात गरजले

'या कार्यक्रमाला आमचे खास बंधू' असं म्हणत उदयनराजे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, त्यामुळे कार्यकर्त्यांसह जनतेत उत्साह संचारलेला पहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजेंनी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे स्वत:च्या स्टाईलमध्ये उद्घाटन करत प्रशासनाला धक्का दिला होता. मराठा आरक्षण टिकण्यासाठी समाजाने सरकारवर दबाव टाकला पाहिजे. राजकारण विरहित संघटना मराठा आरक्षणावर लढण्यासाठी निर्माण केली पाहिजे, तसेच मराठा आरक्षणाचा अंतिम लढा दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली व्हावी, अशी भावना व्यक्त करत शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. या दोन्ही राजेंचा एकाच व्यासपीठावरचा संवाद जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, तिन्ही राजे कार्यक्रमास येणार असल्याने नागरिकांत उत्साह होता. मात्र, संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची सातारकरांना हुरहुर लागली होती.

मराठा आरक्षणाचा अंतिम लढा छत्रपतीं च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News MP Udayanraje Bhosale Appreciates MLA Shivendrasinghraje Bhosale