
चितळी ग्रामपंचायतीसाठी गुदगे व येळगावकर या पारंपरिक विरोधी गटांत सामना रंगला आहे.
मायणी (जि. सातारा) : चितळी (ता. खटाव) ग्रामपंचायतीसाठी गुदगे व येळगावकर या पारंपरिक विरोधी गटांत सामना रंगला असून, विकासकामांच्या जोरावर गुदगे गटाचा एकतर्फी विजय होणार, की गेल्या पंचवार्षिकप्रमाणे निवडणूक घासून होणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
चितळी ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनेल यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रभाग तीनमध्ये सर्व तीनही जागा खुल्या असल्याने तेथे कॉंटे की टक्कर होणार आहे. हा प्रभाग खटाव पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती हिराचंद पवार व त्यांचे विरोधक ऍड. हणमंतराव जाधव यांचा असल्याने तो जिंकणे प्रतिष्ठेचे झाले आहे. दोन्ही गटांमार्फत प्रभागनिहाय बैठका, कोपरा सभा घेण्यात येत आहेत. घरोघरी गाठीभेटी घेतल्या जात आहेत. आवश्यक तेथे गुदगे आणि डॉ. येळगावकर यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन रुसवे-फुगवे काढले जात आहेत, काही आश्वासने दिली जात आहेत.
Gram Panchayat Election : खंडाळा तालुक्यात महिलाराज; तब्बल 84 महिलांची बिनविरोध निवड
उपसभापती हिराचंद पवार, निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक रामराव पवार, शंकरराव पवार, श्रीरंग फाळके, सचिन पाटील हे तेथील गुदगे गटाची धुरा सांभाळत आहेत, तर ऍड. हणमंतराव जाधव, प्रशांत पवार व त्यांचे सहकारी येळगावकर गटाची खिंड लढवत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन्ही गटांना 15 पैकी सात सात जागा मिळाल्या होत्या. तर एका जागेसाठी समान मते मिळाली होती. त्यावेळी चिठ्ठीपद्धतीनुसार गुदगे गटाचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीत केवळ बहुमत मिळणार, एकतर्फी होणार, की घासून, की टक्कर होणार, याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.
ढेबेवाडी खोऱ्यात आघाडीत बिघाडी; मुंबईकरांच्या भूमिकेकडे लक्ष
संपादन : बाळकृष्ण मधाळे