साताऱ्यात अवकाळीच्या तडाख्यात पिके जमीनदोस्त; रब्बीतील पिकांचे अतोनात नुकसान

संजय साळुंखे
Thursday, 18 February 2021

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर व परिसरात सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला.

सातारा : जिल्ह्यातील बहुतांश भागात आज अवकाळी पावसाने झोडपले. पहाटे व दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोळमध्ये (ता. खटाव) दुपारनंतर गारांच्या वर्षावात ढगफुटीसदृश पाऊस झाला. मोळमधील काही भागात गारांचा खच पडला होता. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल सायंकाळनंतर काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर व परिसरात सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. आज पहाटे काही ठिकाणी मुसळधार व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर दुपारी दोनपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मोळमध्ये तर ढगफुटीसदृश पाऊस पडला. शेतात, रस्त्यावर, अंगणात गारांचा खच पडला होता. अन्य भागातही मुसळधार पाऊस झाला. शिवथर परिसरात शेतात पाणी साचले होते. 

कोकणात रब्बी पिकांना मोठा फटका ; गारांसह अवकाळीने जिल्ह्याला झोडपले, आंबा बागायतदार चिंतेत!

सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा, बटाटा आदी पिकांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय जावळी व महाबळेश्‍वर तालुक्‍यात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. खटाव, माण तालुक्‍यात कांदा व बटाट्याची काढणी सुरू आहे. शिवारात काढून ठेवलेले पीक प्लॅस्टिकच्या कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. ज्वारी, गव्हाची मळणी सुरू आहे. 

अनेक शेतकऱ्यांचा कांदा, बटाटा, ज्वारी, गहू ही पिके शेतातच काढून ठेवल्याने ती भिजली. सोसाट्याच्या वाऱ्याने माण, खटाव तालुक्‍यांत ठिकठिकाणी ज्वारी, गहू व मका जमीनदोस्त झाली. त्याशिवाय कलिंगड, काकडी व भाजीपाल्याचेही नुकसान झाले. रब्बी हंगामाच्या तोंडावरच हा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पावसाने आंब्याचा मोहर जमिनीवर पडला, तर द्राक्षांचेही नुकसान झाले आहे. सध्या जिल्ह्यात कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यासाठी शिवारांत जोरात ऊसतोडणी सुरू आहे. मात्र, या पावसाने ऊसतोडणी थांबली आहे. पावसाने उघडीप देईपर्यंत ऊसतोड करता येणार नाही. 

अवकाळी पाऊस धडकला; गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान

  • ज्वारी, गहू, मका जमीनदोस्त 
  • कांदा, बटाट्याच्या काढणीवर परिणाम 
  • कणसात आलेली ज्वारी काळी पडण्याचा धोका 
  • शिवारात पाणी साचल्याने ऊसतोडी थांबल्या 
  • जावळी, महाबळेश्‍वर तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीचे नुकसान 
  • ठिकठिकाणी आंब्याचा मोहर झडला 
  • कलिंगड, काकडी, भाजीपाल्यालाही फटका 
  • वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Rain News Major Crop Damage Due To Rains In Satara