
Satara News : कर्मचाऱ्यांच्या अडचणीबाबत तोडगा काढा
सातारा : अनुकंपा तत्त्वावरील भरती, निवृत्त, तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अडचणी व वारसांना द्यावयाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रशासकीय पेचाच्या अनुषंगाने आज सातारा म्युनिसिपल कामगार युनियन आणि पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यात संयुक्त बैठक झाली.
बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतर त्यातून तोडगा काढण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना अभिजित बापट यांनी पालिकेच्या आस्थापना विभागास दिल्या.
निवृत्त, तसेच कार्यरत कर्मचारी, सातवा वेतन आयोगाचा फरक, मृत वारसांना नोकरीत संधी देण्याच्या मागणीबाबत सातारा म्युनिसिपल कामगार युनियनने पालिकेकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला होता. वारंवार पत्रव्यवहार व बैठका घेऊनही मागण्यांबाबत तोडगा निघत नसल्याने कामगार युनियनने प्रशासनाच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता.
याची दखल घेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी, तसेच युनियनच्या वतीने निशांत पाटील, कॉ. अतुल दिघे, सुनील भोजने, सतीश कांबळे व इतर पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत कालबद्ध पदोन्नती, सेवाज्येष्ठता, सातवा वेतन आयोग फरक, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणे व इतर मागण्या व तांत्रिक अडचणींबाबत निशांत पाटील, कॉ. अतुल दिघे यांनी मते मांडली. या वेळी मागण्या व नेमणुकांच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या तांत्रिक व न्यायालयीन बाबींवरही त्यांनी चर्चा केली.
चर्चेत पुढे आलेले मुद्दे नोंदवून घेत अभिजित बापट यांनी बैठकीस उपस्थित असणाऱ्या विविध विभागांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांबाबत सकारात्मक व गतिमान कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.