कोरोनाकाळात रिअल फायटर ठरली टीम तेजस्वी; गुन्हेगारीवरही आसूड

कोरोनाकाळात रिअल फायटर ठरली टीम तेजस्वी; गुन्हेगारीवरही आसूड

सातारा : "सदरक्षणाय खल निग्रहणाय' या ब्रीदवाक्‍यानुसार ठगांना वठणीवर आणण्याचे काम जिल्हा पोलिस दलाकडून सुरू असून, सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याबरोबरच कोरोनाच्या कालावधीत जशास तसे या पद्धतीने कार्य करत कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दल खऱ्या अर्थाने सर्वच पातळ्यांवर रिअल फायटर ठरले आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे महत्त्वाचे काम पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस दल करत आहे. कोरोनापूर्व काळात गुन्हेगारी रोखण्यासाठी तडीपारी व मोक्कासारख्या कारवायांवर भर देण्यात येत होता. दीड वर्षात जिल्ह्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या 15 टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. 258 जणांना हद्दपार करत जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्याचे प्रयत्न झाले. गुन्हे हे घडत असतातच; ते तातडीने उघडकीस आणण्यावर पोलिस दलाचे नेहमीच लक्ष राहिले. त्यानुसार खुनाचे 71, खुनाच्या प्रयत्नाचे 132, दरोड्याचे 39, जबरी चोरीचे 112, चेन स्नॅचिंगचे 11, घरफोडीचे 107, अन्य चोऱ्यांचे 516 गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले. 

कोरोनापूर्वीच्या काळात या विविध उपाययोजना राबवत नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न झाले. त्याचप्रमाणे गेल्या तीन महिन्यांत पोलिस दल दिवस-रात्र जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नात आहे. लॉकडाउनच्या काळात
पोलिसांनी जिल्ह्यातील प्रवेशाच्या ठिकाणची नाकाबंदी असो किंवा तालुका व शहराच्या ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलिस दलाने चांगले काम केले. त्यातही नागरिकांवर बळाचा वापर न करता कायदेशीर मार्गाने नियम
मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यावर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा विशेष भर राहिला. त्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये निर्माण होऊ पाहणारा रोष कमी झाला. 

गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर तब्बल एक हजार 844 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकी जप्त करण्याची मोहिमही जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यानुसार तीन हजार 368 दुचाकी तर, 185 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांव्यतिरिक्त समाजामध्ये कोरोनाचा फैलाव होण्यावर अंकुश बसला आहे. केवळ कायद्याचा बडगा न उगारता गरीब व गरजूंना मदतीचे कामही पोलिस दलाकडे केले गेले. त्यात जिल्ह्यातील सहा हजार 150 गरजू कुटुंबांना अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे पोलिस दलाबद्दल समाजामध्ये एक चांगला संदेश जाण्यास मदत झाली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून समाजात कायदा व सुव्यवस्था राबविण्याचे काम करण्याबरोबरच कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामातही
महत्त्वाची जबाबदारी पार पाडत अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस दल खरे फायटर ठरले आहे. 

पोलिसांच्या आरोग्यावरही लक्ष नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करण्यात पोलिस दलाला मोटीव्हेट करण्याबरोबर अधीक्षक सातपुते यांनी त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. त्यामध्ये सर्व पोलिस व होमगार्डना फेसशिल्ड, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, थर्मामीटर,
ऑक्‍सीमीटर, गॉगल्स तसेच व्हिटॅमीन डी, आर्सेनिक अल्बम, हायड्रोक्‍लोरिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार सुटी देण्यात आली. तसेच 50 वर्षांवरील कर्मचारी, गर्भवती महिला, आजार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन काम देण्यात आले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी ताकदीने  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुकाबला केला. 
 
पालकांनी मुलांशी संवाद साधला नाही तर काय घडू शकते, वाचा तेजस्वी सातपुतेंचे मत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com