पर्यटक घरी; पर्यटनस्थळे पडली ओस

patan
patan

तारळे (जि. सातारा) : "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे', अशा कवितेतील वर्णनाप्रमाणे निसर्गाचे मनमोहक रूप म्हणजे पावसाळा. अशा पावसाळ्यात पर्यटकांची आपसूकच पावले पर्यटनासाठी बाहेर पडतात. मात्र, कोरोनाचा कहर पाहता यंदा पर्यटकांनी घरी राहणेच पसंत केले असून सर्व पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. 

जून महिन्यात पहिल्या पावसाबरोबर डोंगरावर गवताचे गालिचे येण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यात सर्व निसर्ग हिरवा शालू लपेटून पर्यटकांना आकर्षित करतो. विभागातील मुख्य आकर्षण म्हणजे सडा वाघापूरचा उलटा धबधबा, धुक्‍यात हरवलेल्या पवनचक्‍क्‍या, रस्ता, कौलारू बैठी घरे, अंगाला झोंबणारा गार वारा, पावसाचा शिडकावा असे बेभान करणारे वातावरणाचा अनुभव लुटण्यासाठी हजारो पर्यटक पठारावर गर्दी करतात. मात्र, यंदा जुलै महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. त्याचा दृश्‍य परिणाम पर्यटनावर झाला आहे.

तारळे विभागातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा, तोंडोशीतील समर्थ स्थापित रामघळ, तीर्थक्षेत्र जळव जोतिबा, मार्गातील देवळकडा धबधबा, तारळी धरण आदी ठिकाणे पर्यटकांविना ओस पडली आहेत. गावाकडे आलेल्या अनेक मुंबईकरांनी पठारावर छोटेखानी व्यवसाय थाटले होते. मात्र, पर्यटकांविना त्यांना फटका बसला आहे. एकूणच यंदा कोरोनाने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. त्यातून पर्यटनदेखील सुटले नाही. 

दुर्लक्षित पाबळ धबधबा 
तारळी धरणाच्या पश्‍चिमेला डोंगरावर जिमनवाडी व बामणेवाडी आहे. या दोन्ही गावांच्यामधून पाबळ नावाचा ओढा वाहतो. हाच ओढा पुढे धरण्याच्या जलाशयाकडे उंच डोंगरावरून खाली कोसळतो. सुमारे दोन टप्प्यांत व शंभर मीटरहून अधिक उंचीवरून हा धबधबा कोसळतो. जिमनवाडीकडून ओढ्यालगत डोंगर उतरून खाली गेल्यावर धबधबा दृष्टीस पडतो. मात्र, समोरून पूर्ण धबधबा दृष्टीस पडत नाही. घनदाट वनराईतून कोसळणारा हा दुर्लक्षित पाबळचा धबधबा नयनरम्य आहे. तारळी धरणाचा अथांग जलाशय डोळ्यात साठवून ठेवता येतो. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com