सातारा : जिल्ह्यात आजपासून क्षयरोग शोध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tuberculosis

सातारा : जिल्ह्यात आजपासून क्षयरोग शोध मोहीम

सातारा : क्षयरोग दूरीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात उद्यापासून (ता. १६) क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये २१७ पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे चार लाख ३३ हजार ३६५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

साखळी खंडित करण्याचे उद्दिष्ट

क्षय रोगाच्या जिवाणूची साखळी खंडित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अती जोखमीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे.

कोठे होणार तपासणी

या मोहिमेअंतर्गत अती जोखमीच्या भागावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामध्ये झोपडपट्टी, खाण कामगार, वीट, बांधकाम व कापड कामगाराची राहण्याची ठिकाणे, औद्योगिक कामगार, एचआयव्ही रुग्ण, अनाथालय, बेघर, असंघटित कामगार, आदिवासी शाळा, वसतिगृहे व पोचण्यासाठी अवघड असलेल्या ठिकाणी हे सर्वेक्षण होणार आहे.

शोध मोहिमेचा उद्देश

लोकांमध्ये क्षय रोगाची जनजागृती करणे, लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची थुंकी नमुने, तसेच क्ष किरण तपासणी व इतर आवश्यक चाचण्या करणे, निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करणे, त्यातून रुग्णांचे प्रमाण कमी करून शहरी व ग्रामीण भागातून क्षय रोगाचे उच्चाटन करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

हेही वाचा: मुंबई: कांजूरमार्गमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

एकूण २१७ पथकांची नियुक्ती

जिल्ह्यातील चार लाख ३३ हजार ३४५ लोकसंख्येपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट या सर्वेक्षणामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेवक व अन्य कर्मचारी अशा २१७ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके लोकसंख्येच्या १५ टक्के संशयित लोकसंख्येची तपासणी करून पाच टक्के रुग्णांचा शोध घेणार आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरी भागात घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत.

लक्षणे असल्यास संपर्क साधा

दोन आठवड्यांचा कफ, खोकला, दोन आठवड्यांचा ताप, वजनामध्ये लक्षणीय घट, थुंकीतून रक्त पडणे तसेच छातीत वेदना होणे ही क्षय रोगाची लक्षण आहेत. योग्य उपचार झाल्यास क्षय रोग पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी तातडीने जवळच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी केले आहे.

loading image
go to top