लोहमार्गाचे दुहेरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर!

Satara
Satara

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : पुणे-मिरज लोहमार्गावरील कऱ्हाड ते ताकारी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर आखलेल्या या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. संबंधित विभागाचा हा प्रकल्प यशस्वी झाला असला, तरी शेणोली येथे मार्ग बनवताना अधिग्रहण केलेल्या जमिनीलगतची सुमारे 30 एकर शेती बाधित होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एका बाजूला दळणवळणाची सोय झाली. मात्र, दुसरीकडे हे काम शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. सदरची शेती पाण्याखाली जात असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे. यावर ठोस तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वे खात्याने कऱ्हाड ते ताकारी लोहमार्गाचे दुहेरीकरण करण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला. मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण यांसह आवश्‍यक सेवा-सुविधा उभारण्यास घेतल्या. दोन वर्षांत हे काम पूर्ण झाले. शेणोली येथे दुहेरीकरण करताना जमिनींचे अधिग्रहण केले. त्याच ठिकाणी तसेच मोऱ्यांमध्ये माती पडली. त्यामुळे ही ठिकाणे तुंबल्याने त्यातील पाणी सुमारे 30 एकर क्षेत्रात पसरत आहे.

मागील पावसाळ्यानंतर ही समस्या उद्‌भवली आहे. मार्गाचे काम होण्यापूर्वी 100 टक्के पिकणारी सदरची शेती आजमितीला नापीक बनली आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेने घेतल्या आहेत व उर्वरित शेतीत पाणी साचल्याने त्या खराब होत चालल्या आहेत. निचऱ्याची ठिकाणे व ओढे मुजल्यामुळे लोहमार्गाच्या पूर्वेकडील शेतीची वाटचाल नापिकतेकडे होऊ लागली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून पिके वाया जात आहेत. बहुतांशी पिके अतिपाणीसाठा झाल्याने पूर्णतः खराब होत आहेत. या समस्येकडे केंद्र शासनातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, हे नक्की. 

""शेणोलीत 30 एकर शेतीचे पाणी साचण्यामुळे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आम्ही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती कथन केली आहे. त्यांनी पाठपुरावा केल्यास शेती बाधित होण्यापासून वाचवता येईल.'' 

-सुनील कणसे, 
शेतकरी, शेणोली 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com