Satara: अखेर शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजेंची भेट झालीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजेंची भेट
अखेर शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजेंची भेट झालीच

सातारा : अखेर शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजेंची भेट झालीच

सातारा : जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीसाठीच्‍या अर्ज माघारी घेण्‍याच्‍या दिवशी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यासह आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडी जाहीर झाल्‍यानंतर उदयनराजेंनी जाहीर केल्‍यानुसार आज शिवेंद्रसिंहराजेंची ‘सुरुची’ येथे भेट घेत त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. औपचारिक चर्चेदरम्‍यान शिवेंद्रसिंहराजेंनी ‘शेवटी काय तुम्‍हाला जे करायचे होते ते केलेच’, असे वक्‍तव्‍य उदयनराजेंना उद्देशून केले. याचा प्रतिवाद करताना ‘दहा ठिकाणी निवडणूक लागलीय, आमची झाली ना बास झालं’, असे वक्‍तव्‍य करत उपस्‍थितांमध्‍ये हास्‍य फुलवले.


जिल्‍हा बँकेच्‍या संचालक मंडळात उदयनराजे यांच्‍या समावेशाला राष्‍ट्रवादीसह शिवेंद्रसिंहराजेंचा विरोध होता. याबाबत वरिष्‍ठ स्‍तरावरील प्रत्‍येक बैठकीत कधी तो निर्णय शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवा, तर कधी शिवेंद्रसिंहराजे तो निर्णय खासदार शरद पवार, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सोपवा, अशी मागणी होत होती. नावावर एकमताची मोहोर उमटत नसल्‍याने उदयनराजेंनी ‘काहीही झाले तरी मी आहेच’, असे वक्‍तव्‍य करत रान तापविण्‍यास सुरुवात केली होती.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

जिल्ह्यातील ज्‍येष्‍ठांच्‍या गाठीभेटी घेत उदयनराजेंनी निवडणुकीचे वातावरण तापवले होते. याचदरम्‍यान त्‍यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेणार असल्‍याचे सांगत ते न भेटल्‍यास त्‍यांना गाठणारच, असे वक्‍तव्‍य केले होते. उदयनराजेंच्‍या या वक्‍तव्‍यामुळे अर्ज माघारीच्‍या वेळी होणाऱ्या हायव्‍होल्‍टेज ड्राम्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंच्‍या विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेत त्‍यांच्‍या बिनविरोध विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजेही बिनविरोध निवडून आले.
अर्ज माघारीचे सोपस्‍कार पार पडल्‍यानंतर दुपारी उदयनराजे हे शिवेंद्रसिंहराजेंच्‍या ‘सुरुची’ या निवासस्‍थानी गेले. पुष्‍पगुच्‍छ, भेटवस्तू देत उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा सत्‍कार केला. यानंतर त्‍यांनी निवडणुकीबाबत शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा केली. यावेळी वेदांतिकाराजे भोसले व इतर प्रमुख उपस्‍थित होते. निवडणुकीविषयी माहिती देतानाच शिवेंद्रसिंहराजेंनी ‘तुम्‍हाला काय पाहिजे ते करायचे, ते केलेच ना’, असे वक्‍तव्‍य केले. यानंतर ‘आमची झाली ना बास झालं!’, असे वक्‍तव्‍य उदयनराजेंनी करत उपस्‍थितांमध्‍ये हास्‍य फुलवले.

loading image
go to top