ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'..!

बाळकृष्ण मधाळे
Saturday, 1 August 2020

एक घटना कर्नाटकातून समोर आली आहे. ही घटना वाचून तुमचे डोळे नक्की पाणावतील. माहितीनुसार, एका आईने आपल्या मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देता यावं यासाठी स्वतचं मंगळसुत्र गहाण ठेवून टीव्ही खरेदी केला आहे.

सातारा : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी काही ठिकाणी मात्र लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे मुलांना शाळेत न जाता घरूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे. 

भारतात अशी अनेक कुटुंब आहेत. ज्या ठिकाणी मुलांकडे डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत; पण मोठ्या संख्येने पालक आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी काही ना काही खटाटोप करून अभ्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहेत.

अशीच एक घटना कर्नाटकातून समोर आली आहे. ही घटना वाचून तुमचे डोळे नक्की पाणावतील. माहितीनुसार, एका आईने आपल्या मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देता यावं यासाठी स्वतचं मंगळसुत्र गहाण ठेवून टीव्ही खरेदी केला आहे. कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील नारागुंडा तालुक्यातील राडोर नागानुर गावातील हे कुटुंब आहे. मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसुत्र गहाण ठेवणाऱ्या या महिलेचं नाव कस्तुरी आहे. कस्तुरीला दोन मुलं असून सातवी आणि आठवीला ही मुलं शिकतात.

शिक्षकांनी सांगितले की, डीडी चंदन चॅनलवर ब्रॉडकास्ट केल्या जात असलेल्या शिकवण्यांद्वारे अभ्यास करावा लागेल; पण घरात टीव्ही नसल्यामुळे मुलं शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हती. हे पाहून कस्तुरी फार अस्वस्थ झाल्या. त्यामुळेच कस्तुरी यांनी स्वतःचं मंगळसुत्र गहाण ठेवलं आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मुलांच्या अभ्यासाठी टिव्ही विकत घेऊन दिला. आता डीडी चंदन चॅनल पाहून या कुटुंबातील दोन्ही मुलं अभ्यास करत आहेत. त्यामुळे कस्तुरी यांच्या मनात समाधानाची भावना आहे. आईने मुलांसाठी केलेल्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Women From Karnataka Sold Gold Ornaments For Childrens Online EducationSatara Women From Karnataka Sold Gold Ornaments For Childrens Online Education