सातारा : कुस्तीगिरांनी ऑलिंपिक गोल्ड मेडलचे लक्ष ठेवावे

एकनाथ शिंदे; ज्येष्ठ पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात योगदान द्यावे
एकनाथ शिंदे ज्येष्ठ पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात योगदान द्यावे
एकनाथ शिंदे ज्येष्ठ पैलवानांनी कुस्ती क्षेत्रात योगदान द्यावेsakal

सातारा: कुस्तीतून निवृत्त झाल्यावर वस्ताद आणि ज्येष्ठ पैलवानांनी नव्याने कुस्ती क्षेत्रात येणाऱ्या पैलवानांना घडविले पाहिजे. नवीन पैलवानांनीही वस्तादांचा मान राखला पाहिजे. महाराष्ट्राला कुस्ती व वस्तादांची मोठी परंपरा आहे. मातीच्या कुस्तीने अनेक पैलवान घडविले आहेत. खाशाबा जाधवांनी पदक मिळवले होते. महाराष्ट्राचे नाव पुन्हा जगभर उज्ज्वल करायचे असेल, तर ऑलिंपिकचे गोल्ड मेडल मिळाले पाहिजे. त्यासाठी पैलवानांना व कुस्तीगीर परिषदेला लागेल ते सहकार्य शासनाच्या वतीने केले जाईल, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुस्तीशौकिनांना दिली.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या कार्यक्रमात मंत्री शिंदे बोलत होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, अशोक मोहोळ, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, आमदार दीपक चव्हाण, शशिकांत शिंदे, महेश शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राम सातपुते, चंद्रजित नरके, धवलसिंग मोहिते, संजीवराजे नाईक निंबाळकर, पद्मभूषण पैलवान सतपाल सिंग, काका पवार, योगेश दोडके, दीपाली सय्यद, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमीत ही महाराष्ट्र केसरी पुन्हा ६० वर्षांनंतर होतेय याचा अभिमान आहे. दीपक पवार यांचे वडील साहेबराव पवार यांनी त्या स्पर्धेचे आयोजन केले होते. आज त्यांचे इतके वय असतानाही त्यांनी सगळ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दीपक पवार माझ्याकडे आल्यानंतर महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा साताऱ्यात करतोय, असे सांगितले. त्या वेळी सातारा माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे आपण सर्वजण मिळून हे काम पार पाडूया. कोठेही उणीव भासणार नाही, असा शब्द दिला होता. त्यामुळे आज मोठ्या दिमाखात सोहळा होत आहे. सतपाल यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ पैलवानांनी निवृत्त झाल्यावर नवीन पैलवान घडविले पाहिजे. पैलवान होणे सोपे नसते. कितीतरी वर्षे मेहनत करावी लागते.

मन खंबीर ठेऊन सगळे डावपेच शिकावे लागतात. राजकारणातील आणि कुस्तीतील डावपेच वेगळे असतात. राजकारणातील डावपेच सोपे असतात; पण कुस्तीत मेहनत मोठी असते. मातीची कुस्ती मेहनतीची असून, त्यातूनच पैलवान घडविले जातात. खाशाबा जाधव यांनी प्रथम ऑलिंपिक पदक मिळविले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे नाव जगभर उज्ज्वल करायचे असेल, तर ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्य कुस्तीगीर परिषद व पैलवानांना शासनाच्या वतीने सर्व ते सहकार्य केले जाईल. शरद पवार साहेबांनी ही स्पर्धा जिल्ह्याला दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. साताऱ्याचा हा अभिमान आहे. खाशाबा जाधव यांना पद्मश्री मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांचे चिरंजीव प्रयत्न करत आहेत. केंद्राशी संबंधित काही प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यासाठी खासदार उदयनराजे, श्रीनिवास पाटील त्यांच्या माध्यमातून सर्व जण प्रयत्न करूया, महाराष्ट्राचा मान वाढू शकतो.’’ कुस्ती स्पर्धेचे चांगले नियोजन केल्याबद्दल मंत्री शिंदे यांनी साहेबराव पवार, दीपक पवार आणि सुधीर पवार यांचे विशेष अभिनंदन केले.

दीपक पवार म्हणाले, ‘‘बारामती येथे आम्‍ही खासदार शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्‍यान त्‍यांनी सातारा येथे यंदा महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यास संमती दर्शवली. संमती दर्शवत असतानाच त्‍यांनी दीपक खूप खर्च येईल, असे सांगितले. मी म्‍हणालो, तुम्‍ही द्या, आम्‍ही सगळ्यांच्‍या मदतीने स्‍पर्धा पार पाडतो. आमच्‍या वडिलांनी १९६३ मध्ये पहिल्‍यांदा ही स्‍पर्धा सातारा येथे घेतली होती. त्‍यांचे वय आता ९७ आहे. त्‍यांच्‍या इच्‍छेखातर ही स्‍पर्धा आम्‍हाला द्या, अशी विनंती करत आम्‍ही ती पार पाडतो, असे मी त्‍यांना सांगितले. त्‍यांनी कुस्‍तीगीर परिषदेच्‍या मान्‍यतेने ही स्‍पर्धा आम्हाला दिली. यानंतर मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्‍यांनी दीपक मी भूमिपुत्र आहे. साताऱ्यात स्‍पर्धा होतेय म्‍हणल्‍यावर माझ्‍याकडून काहीही कमी पडणार नाही, अशा शब्‍द दिला. त्‍यांनी तो पाळला. त्‍यांच्‍याप्रमाणेच इतरांनीही स्‍पर्धेसाठी सढळ हाताने मदत दिली.’’

सुधीर पवार म्‍हणाले, ‘‘गेली ६० वर्षे आम्‍ही जिल्‍हा तालीम संघाच्‍या माध्‍यमातून कार्य करत आहोत. या काळात आम्‍ही आमचा स्‍वाभिमान कुठेही गहाण ठेवला नाही. यामुळेच आम्‍ही आज सगळ्यांसमोर बेधडक बोलू शकतो. अलीकडच्‍या काळात आमच्‍या संस्‍थेविषयी अपप्रचार करण्‍यात येत आहे. काही जणांना त्‍यासाठी काही जण बळ देत आहेत. ही संस्‍था यशवंतराव चव्‍हाण आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्‍या आशीर्वादातून उभी राहिली आहे. ही संस्‍था नंतर श्रीरंगअप्‍पा जाधव आणि साहेबराव पवार यांनी वाढवली.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com