esakal | Satara: शाळेची घंटा अधिकारी- पदाधिकाऱ्यांच्या भेटीने! उद्यापासून शाळारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

school bell.jpg

शाळेची घंटा अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या भेटीने! उद्यापासून शाळारंभ

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सातारा: जवळपास दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्यापासून (सोमवार) जिल्ह्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. त्यात पहिल्याच दिवशी अधिकारी- पदाधिकाऱ्यांचा ‘एक दिवस शाळेसाठी’ हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे राज्यातील शाळा बंद आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने राज्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी अन् शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. प्रदीर्घ काळ शाळा बंद असल्याच्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः त्यांच्या अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत मोठा खंड पडला आहे. आॅनलाइन शिक्षणापासूनही बहुतेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, गळतीचे प्रमाण अशा समस्याही निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा: विसर पडलेल्या शाळा सोमवारपासून सुरू होतील, पण...

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे नैराश्याची भावना उद्‍भवली असल्याचे चित्रही आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळावी या हेतूने अधिकारी, पदाधिकारी यांचा ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे यांनी दिली. त्यात जिल्हा परिषद, तसेच पंचायत समितीतील सर्व अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद अन् पंचायत समितीचे सर्व सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रातील एका शाळेत जाऊन शिक्षकांची, विद्यार्थ्यांची भेट घेऊन समुपदेशन करणार आहेत. या उपक्रमांतर्गत शाळेच्या भौतिक, शैक्षणिक व अन्य आनुषंगिक बाबींसाठी मदत, मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही श्री. चोपडे यांनी नमूद केले.

हेही वाचा: शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्स करणार आरोग्याविषयी मार्गदर्शन

‘‘शिक्षक अन् विद्यार्थ्यांत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.’’

- धनंजय चोपडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण विद्यार्थी संख्या

(इयत्ता पाचवी ते बारावी ः ग्रामीण व शहरी भाग)

तालुका शाळा विद्यार्थी संख्या

- जावळी १७१ ७,८०५

- कऱ्हाड २९२ ५६,९९१

- कोरेगाव १३४ २१,३२५

- खटाव १७६ २५,२६२

- खंडाळा ९५ १५,९४६

- महाबळेश्वर १३६ ८,९४७

- माण १३८ २२,२१५

- पाटण ४१५ २३,४१९

- फलटण २४५ ३२,८६०

- सातारा ३१६ ५१,८३६

- वाई १६२ १८,२५५

----------------------------

एकूण - २२८० २,८४,८६१

loading image
go to top