ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान पाचवीलाच पुजलेले!

हेमंत पवार
Thursday, 26 November 2020

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजूर लांबून साखर कारखाना कार्यस्थळी येतात. त्यांच्या बरोबर त्यांची मुलेही येतात. शिक्षण सुरू असतानाच त्यांना कारखान्याकडे ऊसतोडीसाठी यावे लागते. त्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मोठी आबाळ होते. 

कऱ्हाड : साखर कारखाने सध्या सुरू झाल्यामुळे ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. कोरोनामुळे ऊसतोड मजुरांसाठी असलेल्या साखर शाळांचे मात्र त्रांगडेच होऊन बसले आहे. शासनाने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले, तरी अजूनही साखर शाळांबाबत स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नच आहे. त्यामुळे मजूरही चिंतेत आहेत.
 
साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाल्यावर ऊसतोड मजूर लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूरसह कर्नाटकातून कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेले होते. ऊसतोड मजूर येताना आपल्या कुटुंबासह येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांची शाळेची सोय व्हावी, यासाठी शासनाने साखर शाळा सुरू केल्या. त्या शाळेत कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली जाते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. यंदा मात्र वेगळी परिस्थती आहे. यंदा कोरोनाचे मोठे संकट आहे.

सध्या ते कमी झालेले असले, तरी ते गेलेले नाही. त्यामुळे साखर शाळा सुरू करताना मोठी जिम्मेदारी शिक्षण विभागाला घ्यावी लागणार आहे. सध्या कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यासाठी मजूरही मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठीच्या साखर शाळेची अद्याप तरी कार्यवाही करण्यात आलेली नाही. शासनाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडूनही शाळांसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्याही कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. एकीकडे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची तयारी केली असली, तरी अद्याप साखर शाळेबाबतची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

शेतकरी संघटनांची कार्यपद्धती देशी दारू दुकानांसारखी; रघुनाथदादांची शेट्टी, खाेतांवर टीका 

शैक्षणिक नुकसान पाचवीला पुजलेले! 

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजूर लांबून साखर कारखाना कार्यस्थळी येतात. त्यांच्या बरोबर त्यांची मुलेही येतात. शिक्षण सुरू असतानाच त्यांना कारखान्याकडे ऊसतोडीसाठी यावे लागते. त्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मोठी आबाळ होते. त्यांना त्यांच्या शाळेत लागलेली गोडी या परिसरात आल्यावर लागतेच असे नाही. त्यामुळे त्यातील अनेक मुले शाळाही सोडून देतात. त्यामुळे शैक्षणिक नुकसान हे ऊसतोड मजुरांच्या पाचवीलाच पुजल्यासारखे आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools From Sugar Factory Areas Are Yet Closed Satara News