esakal | लॉकडाउन नियमांचं उल्लंघन; कऱ्हाड, पुसेगावातील 18 दुकानं सील
sakal

बोलून बातमी शोधा

Sealed 18 Shops

शासनाची परवानगी नसतानाही दुकाने उघडलेल्या तब्बल 18 व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत.

लॉकडाउन नियमांचं उल्लंघन; कऱ्हाड, पुसेगावातील 18 दुकानं सील

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कऱ्हाड (सातारा) : शासनाची परवानगी नसतानाही दुकाने उघडलेल्या तब्बल १३ व्यापाऱ्यांची दुकाने नगरपालिकेने (Karad Municipality) सील केली. त्यांना प्रत्येकी तीन हजारांचा दंड व किमान एक महिना ही दुकाने सील राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत न बसणाऱ्या शहरातील भाजी मंडई (Vegetable market), मुख्य बाजारपेठ, दत्त चौक आदी परिसरातील व्यापाऱ्यांचा त्यात समावेश आहे. (Sealed 18 Shops In Karad Pusegaon For Violating Lockdown Rules Satara Marathi News)

शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कडक लॉकडाउनच्या (Strict lockdown) विरोधात जात कालपासून दुकाने उघडण्याचे जाहीर केले होते. मात्र, पालिका व पोलिसांनी हा प्रयत्न रोखला. त्यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे लेखी अश्वासनही दिल्यानंतर संबंधितांना सायंकाळी सोडण्यात आले. दुकाने उघडण्याचे आवाहन करणाऱ्या व्यापारी प्रतिनिधींनी लॉकडाउनला सहकार्य करण्याचे लेखी देत प्रशासनाला आश्वासित केले आहे, तरीही जी दुकाने उघडली होती. त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली. पालिकेने रात्रीपासून, तर पोलिसांनी सकाळपासून दुकान उघडल्यास कारवाई होईल, असा इशारा दिला होता, तरीही काही व्यापाऱ्यांनी सुरू ठेवलेल्या दुकानांवर कारवाई झाली. त्यात १३ व्यापाऱ्यांची दुकाने सील केली गेली. त्यांच्याकडून प्रत्येकी तीन हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. ही दुकाने महिनाभर दुकाने बंद राहणार आहेत.

हेही वाचा: कोयनेतील प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांकडे सादरीकरण

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या आदेशाचे पालन न झाल्यास दुकाने सील करण्यात येतील.

- रमाकांत डाके, मुख्याधिकार, कऱ्हाड

हेही वाचा: ग्रामीण भागात कहर! टाकेवाडीला कोरोनाचा घट्ट विळखा

पुसेगावमधील पाच दुकाने सील

पुसेगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घालून अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य व्यवसायिकांना सकाळी नऊ ते दोन या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे; परंतु काही व्यावसायिक या निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याने पुसेगाव येथील एक कापड दुकान, दोन स्वीट मार्ट दुकाने, मोबाईल शॉपी, तसेच एक शू मार्टचे दुकान अशी एकूण पाच दुकाने सील करण्यात आली. तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्यांनी उच्चांक गाठलेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील बाधितांची संख्या पाहता लागू केलेल्या निर्बंधांचे लोक सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. पुसेगाव बाजारपेठेमध्ये वारंवार सूचना देऊनही काही व्यावसायिक आपले दुकान दुपारनंतर सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येताच महसूल प्रशासनाचे पुसेगाव तलाठी गणेश बोबडे, मंडलाधिकारी विठ्ठल तोडरमल, सुरेश कंठे, रविराज जाधव यांनी या निर्बंधाची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली.

Sealed 18 Shops In Karad Pusegaon For Violating Lockdown Rules Satara Marathi News

loading image