Patan : माझा डोंगुर कुठं गेलाय, मलाच काय कळंना झालंय; शहाजीबापूंच्या डायलॉगबाजीवर टाळ्या अन् शिट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahajibapu Patil

'मला आता अमेरिका, मलेशिया, थायलंड, जपान, श्रीलंकेतून फोन यायला लागल्यात.'

Patan : माझा डोंगुर कुठं गेलाय, मलाच काय कळंना झालंय; शहाजीबापूंच्या डायलॉगबाजीवर टाळ्या अन् शिट्या

कऱ्हाड (सातारा) : झाडानं, डोगरानं मी कुणीकडं गेलोय हे मलाच कळंना झालंया. मला अमेरिका, मलेशिया, थायलंड, जपान, श्रीलंकेतून फोन यायला लागल्यात. माझा डोंगुर कुठं गेलाय, मलाच काय कळंना झालंय, अशी मिश्कील टिप्पणी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी दौलतनगर (ता. पाटण) इथं केली.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) वाढदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहाजीबापू म्हणाले, 'मी गुवाहाटीला गेलो नसतो तर लोकांनी आज मला टाळीसुध्दा वाजवली नसती. मात्र, मी गुवाहाटीला (Guwahati) गेल्यामुळं जगात पोहोचलोय. मित्रांनो, काळजाच्या अंतःकरणातून निघालेला कोणताही आवाज असो, काम असो, नजर असो ती भगवंतापर्यंत पोहोचतेच. पंढरपुरातील (Pandharpur) तनपुरे महाराजांच्या मठात हत्तीचा पाय मगरीच्या जबड्यात दाखवला आहे. हत्तीच्या सोंडेत कमळाचं फुल दाखवलं आहे. हत्तीला मगरीपासून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र फेकून मारतो आणि मगर मरते. हा प्रचंड मोठा पुतळा मठात आहे. त्यावेळी हत्तीनं कोणती प्रार्थना, आरती केली होती का? एका हत्तीसाठी जर भगवन श्रीकृष्ण येत असेल तर आपल्यासाठी भगवंत का येणार नाही.'

माझ्या 20 वर्षाच्या राजकारणाच्या वेदना, दुःख मी माझ्या एका मित्राला फोनवरुन बोलवून दाखवल्या. ती वास्तवता जगानं, मराठी माणसानं स्वीकारली. माझी मानदेशी गावरान भाषा जगाला आवडली. झाडानं, डोगरानं मी कुणीकडं गेलोय हे मलाच कळंना झालंय. अमेरिका, मलेशिया, थायलंड, जपान, श्रीलंकेतून फोन येत आहेत. माझा डोंगुर कुठं गेलाय, आता मलाच काय कळंना झालयं, अशी त्यांनी डायलॉगबाजी केली.

शहाजीबापूंच्या डायलॉगवर टाळ्या अन् शिट्या

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं काय ओकेच! शंभूराज मंत्री, ओके.., एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके.. शिंदे-फडणवीसांचं सरकार.. ओकेच, असा डायलॉग मारताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांचा कडकडाट केला.