अजितदादांनी मंत्रिमंडळाची काळजी करू नये;आ. शहाजीबापू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahjibapu Patil

अजितदादांनी मंत्रिमंडळाची काळजी करू नये;आ. शहाजीबापू पाटील

कऱ्हाड : सुधाकर नाईक यांच्या वेळी झालेल्या बंडामुळे पावणेदोन महिने मंत्रालय बंद होते. त्यांच्याच मंत्रिमंडळात अजित पवार राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचे कारण नाही. राज्यात चांगला कारभार सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार थोड्याच दिवसात मार्गी लागेल, असा टोला शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आज येथे लगावला.

विरोधी पक्षनेते पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने कामे रखडली आहेत. त्या प्रश्नावर आमदार पाटील हे कऱ्हाड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सुधाकर नाईक यांच्या वेळी झालेल्या बंडामुळे पावणेदोन महिने मंत्रालय बंद होते. अजित पवार त्यात राज्यमंत्री होते.

त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचे काही कारण नाही. काही राजकीय परिस्थिती आल्यावर चार दिवस मागे- पुढे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार चांगला चालला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय अजित दादांनी पत्रकारांसमोर ठेवावेत.’’ खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘‘ईडी कोणालाही उठून अटक करू शकत नाही. जर संजय राऊत निर्दोष आहेत, असे त्यांच्या बंधूंना म्हणायचे असेल तर कोर्टासमोर निर्दोषत्व का सिद्ध करू शकला नाही. ते सिद्ध करून जामिनावर सुटून बाहेर यावे. ते जर तुम्ही सिद्ध करू शकला नाही, तर जे जगासाठी ते तुमच्यासाठीही आहे. तुम्ही स्वतःला स्पेशल केस समजू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सर्वांना समान दर्जा, हक्क दिले आहेत. त्यापुढे कोण मोठे, कोण लहान नाही. त्यामुळे संजय राऊत हे स्पेशल केस नाही. तेही सर्वसामान्यच आहेत.’’

आनंदराव पाटलांना आवाहन

सध्या महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडेच मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे आम्हीच सध्या मोठे भाऊ आहोत. माजी आमदार आनंदराव पाटील यांनी आता आमच्या शिंदे गटात सामील व्हावे, असे आवाहन शहाजीबापू पाटील यांनी आज येथे श्री. पाटील यांना केले.

Web Title: Shahjibapu Patil To Ajitdad Worry About The Cabinet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..