esakal | रेमडेसिव्हिर वाटपाचा ठरला Formula

बोलून बातमी शोधा

Remdesivir-.jpg

रेमडेसिव्हिर वाटपाचा ठरला Formula

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व ऑक्‍सिजन बेडच्या 35 टक्के प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यात 388 रेमडेसिव्हिर उपलब्ध होणार असून, सर्वात जास्त 40 रेमडेसिव्हिर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयाला मिळणार आहेत. रेमडेसिव्हिरचा गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

जानेवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. या काळात जिल्ह्यातील अनेक खासगी व सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत, तसेच आयसीयू व ऑक्‍सिजन बेडही मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला पडला आहे. याचबरोबर मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडेसिव्हिरचा तुटवडा पडला होता. त्यामुळे अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिरचा गैरवापर जास्त किमतीने विकल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे आता खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना काही प्रमाणात रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा: 'रेमडेसिव्हिर' चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील

जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या रेमडेसिव्हिरचे 40 खासगी रुग्णालयांना वाटप केले जाणार आहे. यामध्ये सातारा तालुक्‍यातील 16 रुग्णालये, कऱ्हाड आठ, वाई पाच, कोरेगाव तीन, खंडाळा चार, फलटण तीन, खटाव दोन, माण दोन, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील एका रुग्णालयात रेमडेसिव्हिर देण्यात येणार आहे, तसेच जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर वितरित केल्या जाणाऱ्या खासगी रुग्णालयात आयसीयूचे 341 बेड, तर ऑक्‍सिजनचे 768 बेड उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात 40, तर खटाव येथील आयएमएसआरला 29 रेमडेसिव्हिर देण्यात येणार आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या रेमडेसिव्हिरची संख्या अतिशय मर्यादेत असल्याचे दिसून येत आहे.

गाेलमाल है भाई सब गाेलमाल है; Covid19 साता-याचा डॅशबाेर्ड सुधारा

""केंद्र शासनाच्या नियमानुसारच रेमडेसिव्हिरचा वापर करण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग व ऑक्‍सिजन बेडच्या 35 टक्के प्रमाणात रेमडेसिव्हिर देण्यात आले असून, या इंजेक्‍शनचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.''

जिल्हाधिकारी शेखर सिंह