कोयना धरणग्रस्तांच्या गावागावांत जल्लोष ; महत्त्वपूर्ण प्रश्न सुटला

उमेश बांबरे
Sunday, 23 August 2020

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांचे विविध प्रश्न सोडवण्यातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. आपल्या हक्काच्या लढाईचा एक टप्प्या जिंकला असल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना काेयना धरणग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे.

सातारा : कोयना धरणग्रस्तांच्या पात्र खातेदारांची यादी निश्‍चित झाल्यामुळे धरणग्रस्तांची ससेहोलपट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या आंदोलनामुळे हा महत्त्वाचा निर्णय लागू झाला आहे. त्यामुळे धरणग्रस्त गावांत जल्लोष करण्यात आला.
 
कोयना धरण होऊन 60 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे; पण त्यामध्ये बाधित झालेल्या पात्र खातेदारांची निश्‍चित यादी करण्यात आली नव्हती, तसेच पुनर्वसन कायदा सुद्धा अस्तित्वात नव्हता. त्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्‍नाबाबतचा लढा आणखी तीव्र करण्यात आला होता. सातत्य व चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही घेण्यास भाग पडली होती. त्यानंतर सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आंदोलनाची दखल घेऊन कोयनेचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली. त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात संघटनेच्या आंदोलनामुळे भाग पडले.

तब्बल एक हजार 22 गावांत एक गाव, एक गणपती पॅटर्न रुजला

डॉ. नरेद्र दाभोलकरांच्या नावाने अध्यासन उभारावे : जावळे 

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांचे विविध प्रश्न सोडवण्यातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. आपल्या हक्काच्या लढाईचा एक टप्प्या जिंकला असल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे असे धरणग्रस्तांच्यावतीने चैतन्य दळवी यांनी नमूद केले. या यशामुळे कोयना धरणग्रस्तांच्या गावागावांत जल्लोष करण्यात आला.

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवा- राज्य अपंग कर्मचारी संघटना  

या वेळी संपत देसाई, हरिश्‍चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर, संतोष गोटल, महेश शेलार, सचिन कदम, सीताराम पवार, बळिराम कदम, श्रीपती माने आदी उपस्थित होते. कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आंदोलन सुरू झाल्यावर त्यांची व्यथा जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य प्रधान सचिव प्रवीण परदेशी, भूषण गगराणी, नंदकुमार काटकर, रामचंद्र शिंदे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी (कै.) साहेबराव गायकवाड, आरती भोसले, समीक्षा चंद्रकार, जगदीश निंबाळकर, अनिल ढिकले, सुनीलकुमार मुसळे, सर्व गावांचे तलाठी, मंडलाधिकारी, तीनही तालुक्‍याचे तहसीलदार यांचे कोयना धरणग्रस्तांनी विशेष आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shramik Mukti Dal Agitation Of Koyna Dam Project Affected Successful Says Dr Bharat Patankar