
मलवडी येथील श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सवावर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे असलेले निर्बंध व ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे यात्रा असूनही गावात शांतता होती.
दहिवडी (सातारा) : ना 'येळकोट येळकोट जयमल्हार, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलंचा जयघोष,' ना 'भंडारा खोबऱ्याची उधळण,' ना भाविक भक्तांची लाखोंची गर्दी. या सर्वांची रुखरुख मनात असूनसुद्धा प्रशासन व ग्रामस्थ यांच्या समन्वयामुळे मलवडी (ता. माण) येथील श्री खंडोबाची यात्रा विधिवत साजरी झाली.
मलवडी येथील श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सवावर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे असलेले निर्बंध व ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे यात्रा असूनही गावात शांतता होती. सर्व बाजारपेठ बंद होती, तर सुट्टीमुळे बॅंकाही बंद होत्या. त्यामुळे गावात येण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांकडे कोणतेही कारण नव्हते, तसेच पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
हे ही वाचा : शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई
ऊस, कलिंगड आता केळीचे उत्पादन घेत आहे युवराज
सकाळीच 'श्रीं'चे मुखवटेही रथामध्ये ठेवण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थ मंदिरात येऊन श्री खंडोबाचे दर्शन घेऊन जात होते. गर्दी न होईल याची दक्षता घेण्यात येत होती. दुपारी बारा वाजून 35 मिनिटांनी धुपारतीचा कार्यक्रम झाला. विश्वस्त मानकरी, सालकरी, पुजारी, वाघे व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत 'श्रीं'चे मुखवटे यावेळी पालखीत नेण्यात आले. 'श्रीं'ची आरती झाल्यावर रथपूजन करण्यात आले. मात्र, रथाची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली नाही. नंतर श्री महालक्ष्मीच्या रथाचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीच्या ग्रामप्रदक्षिणेत धुपारतीला उपस्थित लोकच सहभागी झाले होते.
हे ही वाचा : खंबाटकी घाटातील दरीत खजूराचा कंटनेर कोसळला
सर्व विधी पूर्ण करून दुपारी दोन वाजताच पालखी मिरवणूक साजरी झाली. त्यानंतर देवस्थान व ग्रामपंचायतीच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, देवस्थानचे चेअरमन जगन्नाथ सत्रे, सरपंच दादासाहेब जगदाळे, विश्वस्त उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे यांनी यात्रेस उपस्थित राहून श्री खंडोबाचे दर्शन घेतले.