सोळशी ते नायगाव रस्त्याप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा; शिवसेना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सोळशी ते नायगाव रस्त्याप्रश्‍नी आंदोलनाचा इशारा; शिवसेना आक्रमक

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोळशी ते नायगाव या तीन किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

कोरेगाव तालुक्यातून पुढे पुणे-बंगळूर महामार्गाकडे हा रस्ता जातो. कोरेगाव तालुक्यातून अनेक युवक कामानिमित्त शिरवळ व खंडाळा येथे औद्योगिक वसाहतीत जातात. तसेच पुणे, मुंबईत असलेल्या चाकरमान्यांची या मार्गावर सातत्याने वर्दळ असते. शनि मंदिर, हरेश्वर तसेच पाचगणी, महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची वाट बिकट झाली आहे. डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून दुचाकी वाहने घसरून अनेकांना दुखापती झाल्या आहेत. सोळशी व नायगाव ग्रामस्थांना या मार्गाने ये-जा करावी लागते.

त्यांना खड्ड्यांचा नित्याचा त्रास झाला आहे. पुणे, मुंबईला शेतमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या या परिसरात पंक्‍चर होतात. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. खटाव व माण तालुक्यांतील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाकडे येण्यासाठी डिस्कळ व भाडळे दरम्यानची नागेवाडी खिंडीतील घाटरस्त्याचे काम मार्गी लागल्याने या मार्गावर वाहतूक वाढली आहे. त्यामुळे सुरूर ते पिंपोडे बुद्रुक रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणासाठी तीन वर्षांपूर्वी ११ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे काम निकृष्ट झाले असून, वेळे घाटात पावसाचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे पावसात दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. खराब कामामुळे हा रस्ता उखडत असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष सोळसकर यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara