NCP | राष्ट्रवादीची विचारधारा घराघरांत पोचवा : शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar
राष्ट्रवादीची विचारधारा घराघरांत पोचवा : शरद पवार

राष्ट्रवादीची विचारधारा घराघरांत पोचवा : शरद पवार

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर - राष्ट्रवादी कॉँग्रेसची विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर यांची आहे. ती विचारधारा तरुणांनी घराघरांत पोचवून नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याची संधी आहे. आम्ही आता वयाच्या वेगळ्या वळणावर पोचलो आहोत. त्यामुळे नव्या नेतृत्वाची फळी उभारण्याचे आव्हान पक्षाला भविष्यात पेलावे लागणार आहे, असे पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे सांगितले.

येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या समारोप सत्रात खासदार पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, सचिव समीर सुशिलन, सरचिटणीस अमित जोतपुरवाला, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रविकांत करपे, सूरज चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे आदी उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाले, ‘राजकारणात संधी मिळण्याची अनेक जण वाट पाहतात; परंतु राजकारणात संधी कधी मिळत नाही, तर ती संधी हिसकावून घ्यावी लागते. संधी मिळताच खुर्चीवर ताबा मिळवावा लागतो. आम्ही व्यासपीठावर जी मंडळी आहे ती खुर्ची कधी सोडत नसतो. पक्ष संघटना बांधणी करताना विकासात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. राजकारणात आता कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. आता हीच संधी तुम्हाला आहे. पक्षाचा चेहरा बदलण्यासाठी पक्षातील अधिकाधिक तरुण, तरुणींना संधी दिली पाहिजे. आगामी निवडणुकीत तरुणांना कसे सामावून घेता येईल, याबाबत पक्षातील मंडळी लवकरच निर्णय घेतील.’

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

बांगलादेशातील घटनेचे पडसाद आपल्या महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात दंगली घडतात. बंद पाळले जातात. निवेदने दिली जातात, अशा लोकांना भाजपचे काही लोक हेतुपुरस्सर चिथावणी देण्याचे काम करीत असल्याचा आरोपही श्री. पवार यांनी केला. केंद्र शासनाने नुकतेच कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्या संदर्भात ते म्हणाले, ‘देशातील मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी वर्गाबाबत धोरण ठरविताना राज्यांना विश्वासात घेतले जात नाही. या संदभार्त कोणतीही चर्चा केली जात नाही. चर्चा होऊ दिली जात नाही. चर्चा करण्याचा आग्रह धरला असता गोंधळ घातला जातो. पंधरा मिनिटांत कायदे मंजूर होतात. यासाठी शेतकऱ्यांना मोठे आंदोलन करावे लागले. लोकांच्या मागणीचा सन्मान ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या देशापुढे अनेक प्रश्न आहेत. शेतीचे प्रश्न आहे, ग्रामीण भागाचे, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. उद्योग उभारल्या शिवाय बेरोजगारी संपणार नाही त्याचप्रमाणे उद्योगाचे विकेंद्रीकरणही केले पाहिजे.’

या वेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, युवकचे शहर अध्यक्ष रोहित ढेबे, नगरसेवक प्रकाश पाटील, विशाल तोष्णीवाल, ॲड. संजय जंगम, दानिश मुलाणी, बाबूराव सपकाळ, निवास शिंदे, जीवन महाबळेश्वरकर, संदीप मोरे, अनिकेत रिंगे, सुरेश सावंत, मनीषभाई तेजाणी आदी उपस्थित होते.

लोकांमध्ये काम करा

लोकांशी बांधिलकी ठेवणारे, लोकांच्या समस्या सोडविणारे, लोकमान्यता असणारे सर्वात जास्त तरुण आमदार राष्ट्रवादीत आहेत. तरुणांनी लोकांमध्ये जाऊन काम केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top