लालचुटूक स्ट्रॉबेरी चाखत पर्यटक लुटताहेत पाचगणी- महाबळेश्वरात दिवाळी सुटीचा आनंद

रविकांत बेलोशे
Sunday, 15 November 2020

दिवाळीत स्ट्रॉबेरी बाजारात दिसेल, की नाही याची शंका होती; परंतु तुरळक प्रमाणात स्ट्रॉबेरी बाजारात उपलब्ध झाली असल्याने भाव वाढलेले आहेत अशी माहिती बाळासाहेब भिलारे (अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशन) यांनी दिली.

भिलार (जि.सातारा) : पाचगणी- महाबळेश्वरात सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, वातावरणातील बदल, कोरोना व लागवड उशिरा झाल्याने सध्या स्ट्रॉबेरीचा दर गगनाला भिडले आहेत. ही लालचुटूक स्ट्रॉबेरी चक्क 700 रुपये किलोवर पोचली आहे. 
पाचगणी- महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात दर वर्षी 100 ते 150 रुपये किलोने मिळणारी स्ट्रॉबेरी सध्या 700 ते 800 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असले, तरी पर्यटक मात्र खरेदी करताना का कू करताना दिसत आहेत. काही पर्यटक मात्र दर वाढले असले तरी येथील स्ट्राॅबेरीची चवच न्यारी असल्याचे सांगत आहेत.

या वर्षी स्ट्राॅबेरीची लागवड घटल्यामुळे बाजारपेठेवर यापुढेही परिणाम जाणवणार असून, हे भाव कायम राहिल्यास यावर्षी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक सक्षम होतील. लॉकडाउन, परतीचा पावसामुळे उशिरा आलेल्या या फळाने बाजारपेठ कडक केली आहे. महाबळेश्वर वेण्णा लेक, गुरेघर मॅप्रो, पाचगणी बाजारपेठेत, शॉपिंग सेंटर परिसरामध्ये, तसेच पाचगणी- महाबळेश्वर मुख्य मार्गावर ठिकठिकाणी स्ट्रॉबेरी विक्रीचे स्टॉल असून, सध्या स्ट्रॉबेरी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आम्हाला ती या भावाने विकावी लागत असल्याचे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले.

साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर
 
स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे म्हणाले, ""गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या संकटाने अडचणीत सापडलेले पीक शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेमध्ये टाकून गेले, तर नुकसानीमुळे या वर्षी स्ट्रॉबेरी लागवड करण्यास शेतकरी अनुत्सुक असल्याने यावर्षी लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी लागवड खूपच उशिरा सुरू झाली.'' 

""दिवाळीत स्ट्रॉबेरी बाजारात दिसेल, की नाही याची शंका होती; परंतु तुरळक प्रमाणात स्ट्रॉबेरी बाजारात उपलब्ध झाली असल्याने भाव वाढलेले आहेत.'' 

- बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशन

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strawberry Price Hiked In Panchgani Mahableshwar Satara News