सत्तेच्या चाव्या घेऊन मिरविणाऱ्या काँग्रेसला यशासाठी झगडावे लागणार

Satara Political News
Satara Political Newsesakal
Summary

निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावरच लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

सातारा : मागील जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस (Congress) पक्षाने बरेच काही गमावले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतही केवळ चारच नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला मुळापासून तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनी आतापर्यंत सात तालुक्यांचा दौरा करून गट, गणनिहाय इच्छुकांची चाचपणी केली आहे. एकेकाळी जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या घेऊन मिरविणाऱ्या काँग्रेसला या वेळी जास्तीतजास्त सदस्य निवडून आणण्यासाठी झगडावे लागणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत २१ मार्चला संपत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मतदारसंघाचा कच्चा पुनर्रचना आराखडा तयार करून तो मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतरच पुढची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या गट, गणांतून इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच संपर्काच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP) व शिवसेनेने (Shiv Sena) आघाडी घेतली आहे. त्यासोबतच काँग्रेसनेही इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे सात सदस्य निवडून आले होते. त्यापैकी आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना मानणारे सदस्यही भाजपमध्ये गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या विचारांचे तीनच सदस्य असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती फार चांगली आहे, असे म्हणता येणार नाही.

Satara Political News
'मोठी घोषणा करणारी' पोस्ट उदयनराजेंनी केली Delete; शब्द पाळणार?

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेत्यांना आपले गमावलेले गट, गण परत मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. कारण आता त्यांना राष्ट्रवादीसह भाजप व शिवसेनेशीही दोन हात करावे लागणार आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे काँग्रेसलाही स्वबळावरच लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत. त्यामध्ये खटाव, माण, कोरेगाव, फलटण, वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांतील गट व गणनिहाय इच्छुकांची माहिती घेतली असून, कोणता गट काँग्रेसला सोपा राहील, कोणत्या गटात ताकद लावावी लागेल, याची माहिती घेतली जात आहे. इच्छुकांचीही चाचपणी केली जात आहे. आगामी काही दिवसांत गटनिहाय दौरा करून ते इच्छुकांची नावांची यादीच तयार केली जाणार आहे. त्यात कोणते आरक्षण पडले तर कोण उमेदवार राहील, हे निश्चित केले जाणार आहे. यावेळेस काँग्रेसला आपली सात सदस्य संख्या वाढवून पुन्हा २० पर्यंत नेण्यासाठी प्रचंड झगडावे लागणार आहे.

Satara Political News
Udayanraje Birthday : मोठ्या घोषणेपूर्वीच उदयनराजे म्हणाले..

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सात तालुक्यांचे दौरे पूर्ण केले आहेत. तेथील गट, गणनिहाय काँग्रेसची नेमकी परिस्थिती कशी आहे, याची माहिती घेतली आहे. इच्छुकांचीही चाचपणी केली आहे. लवकरच आम्ही गटनिहाय दौरे करून इच्छुकांची मते जाणून घेणार आहोत. काँग्रेसने गमावलेले गट पुन्हा परत मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com