कर्तृत्ववानांच्या संघर्षकथा उमेद वाढविणाऱ्या : डॉ. राजेंद्र माने

दिलीपकुमार चिंचकर
Wednesday, 25 November 2020

आपल्या मातीतही फार मोठी कर्तृत्ववान माणसे आहेत. अगदी येथील सामान्य माणसांतही असामान्यत्व असते. हे जाणून सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान माणसांना समाजापुढे आणण्याचे कार्य "सकाळ'च्या दिवाळी अंकाने केल्याचे साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.

सातारा : रंजनाबरोबरच प्रबोधन करत दर्जेदार दिवाळी अंक देणे ही "सकाळ'ची परंपरा आहे. ती "सकाळ'ने यंदाही कायम जपली आहे. साताऱ्याच्या भूमीतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षकथा लोकांसमोर आणण्याचे मोलाचे कार्य "सकाळ'च्या "उत्सव कर्तृत्वाचा' या दिवाळी विशेषांकाने केले आहे, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी येथे व्यक्त केले. 

"सकाळ' सातारा आवृत्तीच्या "उत्सव कर्तृत्वाचा' या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन डॉ. माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय सुपेकर, सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर आणि "सकाळ टीम' उपस्थित होती. डॉ. माने म्हणाले, ""दिवाळी अंक हे समाजाच्या दृष्टीने आणि नवोदित, प्रथितयश लेखकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. अनेक मोठे लेखक दिवाळी अंकांच्या लिखाणातूनच मोठे झाले आहेत. "सकाळ'च्या वतीने दिवाळी अंकासाठी नेहमीच चांगले विषय निवडले गेले आहेत. आपल्या मातीतही फार मोठी कर्तृत्ववान माणसे आहेत. अगदी येथील सामान्य माणसांतही असामान्यत्व असते. हे जाणून सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान माणसांना समाजापुढे आणण्याचे कार्य "सकाळ'च्या दिवाळी अंकाने केले आहे.''

जिद्द अंध भावंडांची; मनगटातील हिमतीने भेदला जीवनातील अंधार 

श्री. सोळसकर यांनी प्रास्ताविकात दिवाळी अंकाच्या विषयामागची भूमिका विशद केली. ते म्हणाले, ""कोविडनंतरच्या जगात पुन्हा नव्याने सुरवात करत असताना आपल्याच जिल्ह्यातील लोकांच्या या यशकथा सर्वांना उमेद देणाऱ्या ठरतील. या हेतूने जिल्ह्यातील 72 कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवनसंघर्ष या विशेषांकाद्वारे समाजासमोर येईल.'' श्री. सुपेकर म्हणाले, ""सातारा जिल्हा हा कर्तृत्ववान माणसांची खाण आहे. कष्टाने मोठे यश मिळवणारी माणसे येथे आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. साहित्यप्रेमींसह सर्व नागरिकांसाठी हा दिवाळी अंक प्रेरक आहे.'' श्री. निंबाळकर यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Struggling Stories Of Accomplishments That Raise Hopes Dr. Mane Satara News