
सातारा : ऊस गाळपाचा हंगाम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत किसन वीर, खंडाळा कारखाना आणि प्रतापगड-अजिंक्यतारा या तीन कारखान्यांनी गाळप उरकले आहे. उर्वरित कारखाने मार्चअखेरपर्यंत गाळप उरकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून ८२ लाख ३९ हजार ८१७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७८ लाख १० हजार ४८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सर्वाधिक सरासरी ११.२३ टक्के साखर उतारा सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे. सर्वाधिक १३ लाख ४० हजार मेट्रिक टन ऊस गाळप जरंडेश्वर साखर कारखान्याने केले असून, रयत अथणी शुगरने १२.०६ टक्के साखर उतारा घेत आघाडी घेतली आहे.