तारळ्याची बाजारपेठ उद्यापासून हाेणार अनलाॅक

यशवंतदत्त बेंद्रे
Monday, 28 September 2020

प्रशासनाने व्यापाऱ्यांना घालून दिलेल्या नियमानुसार व्यवहार करावेत, अन्यथा दंड व सात दिवस दुकान बंदची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
 

तारळे (जि. सातारा) ः कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, त्यातच मृतांचा वाढता आलेख लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथे पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. बंदला व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी हातभार लागणार आहे.
 
तारळे परिसरात सात ते 14 सप्टेंबर या आठ दिवसांत सुमारे 20, तर विभागात एकूण 30 कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे सर्वांनीच धसका घेतला. वाढणारी रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्यासाठी व्यापारी बाजारपेठ अंशतः बंद ठेवली. 9 ते 2 या काळात व्यवहार सुरू ठेवले, तरीही रुग्णसंख्येवर नियंत्रण न आल्याने बाजरपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे मत पुढे आले.

मराठा समाजाचे उद्या सहकारमंत्र्यांच्या निवासस्थाना समाेर ठिय्या आंदोलन

त्यासाठी कोरोना समिती, राजकीय पदाधिकारी, पोलिस व व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात चर्चा झाली. बैठकीत एकमताने दहा दिवस बाजरपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सर्व व्यापाऱ्यांनी निर्णयाला प्रतिसाद देत कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वांनी आठ दिवस स्वयंस्फूर्तीने अंमलबजावणी केली.

त्यामुळे बाजरपेठेत शांतता आहे. रस्ते निर्मनुष्य आहेत. ऍन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटले आहे. उद्या (मंगळवार) बाजारपेठ उघडली जाईल. सर्वांनी नियम पाळणे गरजेचेच आहे. प्रशासनाने व्यापाऱ्यांना घालून दिलेल्या नियमानुसार व्यवहार करावेत, अन्यथा दंड व सात दिवस दुकान बंदची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tarale Village Market Closed For Seven Days Satara News