esakal | 'सेवेच्या ठायी आम्ही तत्पर'; संकटकाळात एसटी चालक बनणार 'वायुदूत'

बोलून बातमी शोधा

ST
'सेवेच्या ठायी आम्ही तत्पर'; संकटकाळात एसटी चालक बनणार 'वायुदूत'
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना उपचारादरम्यान आवश्‍यक असणाऱ्या ऑक्‍सिजनची वाहतूक करण्याची जबाबदारी आता एसटी महामंडळावर आली आहे. सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार "सेवेच्या ठायी आम्ही तत्पर' असे म्हणत सातारा आगारातील दहा चालक आता वायुदूत बनणार आहेत.

"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद असणाऱ्या एसटी महामंडळाने कोरोनाच्या काळात राज्याच्या परंपरेला साजेसे काम करत आपल्या सेवेचा देशपातळीवर ठसा उमटवला आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाल्यानंतर सर्वसामान्यांना जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता भासू नये, यासाठी एसटीचे चालक दिवस-रात्र मालवाहतूक करत होते. या चालकांमुळेच सर्वसामान्यांचा गेल्या लॉकडाउनमधील त्रास काहीसा कमी झाला होता. मालवाहतूक करतानाच राज्य शासनाच्या आदेशानुसार सातारा आगारातील काही चालकांनी चार-पाच राज्यांच्या सीमा ओलांडत परप्रांतियांना त्यांच्या घरापर्यंत पोचवले होते. या कामाची दखल त्या वेळी राज्य शासनाने घेत सातारा आगारातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची पाठ थोपाटली होती. अनलॉकनंतर एसटी महामंडळाच्या बस पुन्हा एकदा दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्यांच्या सेवेसाठी धावत होत्या. या धावणाऱ्या बसची चाके पुन्हा एकदा पुकारलेल्या लॉकडाउनमुळे जागेवर थांबली. या चाकांना कधी गती मिळेल, याचे उत्तर सध्या तरी नाही.

Don't Worry! साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्लॅंट; Covid रुग्णांना दिलासा

एसटीच्या सातारा आगाराने केलेल्या कामाची दखल घेत कार्यरत असणाऱ्या चालकांपैकी दहा जणांवर आगामी काळात कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्‍सिजनची वाहतूक करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. सुरक्षित आणि गतिमान सेवेचा अनुभव असणाऱ्या चालकांची त्यासाठी निवड करण्यात येणार असून, त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा आगारास दिल्या आहेत. या चालकांची यादी तयार करून त्यांना 24 तास सक्रिय राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सातारा आगाराने अशा चालकांची चाचपणी सुरू केली आहे. चाचपणी पूर्ण झाल्यानंतर या चालकांना प्राणवायूची वाहतूक करणाऱ्यासाठी वायुदूत म्हणून राज्यासह परराज्यातील प्लॅंटमधून ऑक्‍सिजन वाहतुकीसाठी पाठवण्यात येणार आहे. सातारा आगाराने अविरत, अखंडित, सुरक्षित प्रवासासाठी हे ब्रीद खरे ठरवण्यासाठी सेवेच्या ठायी आम्ही तत्पर असल्याचे दाखविण्याची तयारी सुरू केली आहे.

लोणंदची 'सोना' देणार महाराष्ट्राला 'संजीवनी'; अलॉयजमध्ये 15 टन ‘ऑक्सिजन’ची निर्मिती

Edited By : Balkrishna Madhale