esakal | ...अखेर ढेबेवाडीकरांची दूषित पाण्यापासून सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

...अखेर ढेबेवाडीकरांची दूषित पाण्यापासून सुटका

ढेबेवाडीकरांना ग्रामपंचायतीने जुन्या गाव विहिरीवर मोटार बसवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करत मोठा दिलासा दिला.

...अखेर ढेबेवाडीकरांची दूषित पाण्यापासून सुटका

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा): नळयोजनेच्या गढूळ व दूषित पाण्यामुळे अनेक वर्षांपासून हैराण असलेल्या ढेबेवाडीकरांना ग्रामपंचायतीने जुन्या गाव विहिरीवर मोटार बसवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करत मोठा दिलासा दिला.

हेही वाचा: साताऱ्यासह कऱ्हाडात धुवांधार; ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद धरण 'ओव्हरफ्लो'

ढेबेवाडीत अनेक वर्षांपासून नळयोजनेच्या अस्वच्छ व दूषित पाण्याची समस्या कायम आहे. वांग नदीकाठी नळ योजनेची विहीर आणि नदीपात्रात इंटेक जॅकवेल होती. पुराच्या तडाख्याने तिला भगदाड पडून विहिरीत नदीचे पाणी थेट घुसत असल्याने ग्रामस्थांनी त्या वेळी पिण्यासाठी त्या पाण्याचा वापर थांबविला होता. त्यानंतर अलीकडे काही वर्षांपूर्वी नवीन नळयोजना राबविण्यात आली. मात्र, त्यातही मागील दुखणे पुढेही कायम राहिल्याने शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठ्याचे ग्रामस्थांचे स्वप्न स्वप्नच राहिले होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना खासगी कूपनलिका व अन्य पर्यायांचा आधार घ्यावाच लागत होता.

हेही वाचा: 'आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला'; ढेबेवाडी 'आरोग्य'त 14 वर्षांनंतरही सुविधांची वानवाच!

नदीतील पाणी नळयोजनेच्या विहिरीत वळविण्यासाठी केलेली व्यवस्था पुरात उद्‍ध्वस्त झाल्याने आणि मराठवाडी धरणातून नदीपात्रात येणारे गढूळ पाणीही थांबत नसल्याने अलीकडे दीड महिन्यापासून ढेबेवाडीत गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू होता. प्यायला सोडाच, नळाचे पाणी इतर खर्चाला वापरण्यासही ग्रामस्थ कचरत होते. या पार्श्वभूमीवर गावात पूर्वीच्या काळात बांधलेल्या सार्वजनिक विहिरीतून नळ योजनेच्या विहिरीत पाणी सोडण्याचा पर्याय समोर आला. या कामातील तज्ज्ञ माजी उपसरपंच कुमार कचरे यांनी तांत्रिक बाबी तपासून जुन्या विहिरीत दहा अश्वशक्तीचा पंप बसवून मुख्य पाइपलाइनद्वारे नळयोजनेच्या टाकीत पाणी पोचवले.

हेही वाचा: कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर धावली 'लालपरी'

या वेळी सरपंच विजय विगावे, कुमार कचरे, शंकर कारंडे, वसंत स्वामी, ज्ञानदेव पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू आत्तार, कांता घाडगे आदींसह ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नळाला स्वच्छ व शुद्ध पाणी येऊ लागल्याने ढेबेवाडीकरांनी समाधान व्यक्त केले. याकामी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांचेही सहकार्य लाभल्याचे सरपंच विगावे यांनी सांगितले.

loading image
go to top