esakal | सातारा : तीन कोटी दंडाचा ‘महावितरण’ला बसणार शॉक
sakal

बोलून बातमी शोधा

Karhad Municipal Corporation

पहिल्या टप्प्यातील सर्व्हेनुसार हेरिटेज व मोठ्या वृक्षांचेही नुकसान केल्याने वीज कंपनीला प्रति वृक्ष एक लाखाचा दंड करण्याच्या ‘अ‍ॅक्शन मोड’वर पालिका आहे.

तीन कोटी दंडाचा ‘महावितरण’ला बसणार शॉक

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): विनाकारण वृक्ष तोडल्याने वीज कंपनीला पालिकेने प्रतिवृक्ष एक लाखाचा दंड आकारणी करण्याचा दावा कंपनीने फेटाळला आहे. मात्र, तरीही पालिकेकडून वृक्ष तोडल्याबद्दलचा सुमारे तीन कोटींच्या दंडाचा शॉक वीज कंपनीला बसणार आहे. नोटीस बजावून पालिका दंडाची आकारणी करणार आहे. वीज कंपनीने तब्बल ३०० वृक्षांचे विनाकारण व विनापरवाना नुकसान केल्याचा पालिकेचा दावा आहे. त्याचा सर्व्हे सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व्हेनुसार हेरिटेज व मोठ्या वृक्षांचेही नुकसान केल्याने वीज कंपनीला प्रति वृक्ष एक लाखाचा दंड करण्याच्या ‘अ‍ॅक्शन मोड’वर पालिका आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : विवाहितेच्या खूनप्रकरणी आणखी एकजण ताब्यात

वीज कंपनीने केवळ आठ लाखांच्या एका महिन्याच्या थकीत वीज बिलापोटी पालिकेच्या मुख्य कार्यालयासह पंपिंग स्टेशनचे वीज कनेक्शन तोडल्याने खळबळ उडाली. पालिकेच्या सभेत वीज कंपनीचा निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. त्यात राजकारण झाल्याचाही आरोप होत आहे. वीज कंपनीच्या ‘अॅक्शन’ला पालिकेनेही ‘रिअॅक्शन’ देत वीज कंपनीला हेरिटेजसह मोठ्या वृक्षांचे नुकसान केल्याची नोटीस बजावली. मोठ्या वृक्षांच्या फांद्या तोडताना वीज कंपनीने पालिका व वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही, त्यामुळे प्रति वृक्ष एक लाखांचा दंड आकारण्याचा इशारा दिला. पालिकेने वृक्षांचे नुकसान केल्याचा व दंड आकारणीचा दावा वीज कंपनीने फेटाळून लावत झालेली वृक्षतोड कायदेशीर असल्याचे प्रत्‍युत्तर दिले. पालिका व वीज कंपनीत ‘लेटर बॉम्ब’ सुरू असतानाच पालिकेने दुसरीकडे वीज कंपनीला एक दोन नव्हे तर ३०० हून अधिक वृक्षांच्या नुकसानीला जबाबदार धरले आहे.

हेही वाचा: कऱ्हाड पालिका: वीज कंपनीत उडणार भडका

वीज कंपनीने काम करताना वृक्ष तोडण्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. विनापरवाना वृक्षांच्या फांद्या तोडल्या आहेत. स्टेशन रस्ता, वाखाण रस्ता, शिवाजी हाउसिंग सोसायटी या भागात तब्बल ३०० हेरिटेज व मोठ्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या आहेत, त्याशिवाय मुख्य बाजारपेठेसह पेठनिहाय सर्व्हे सुरू आहे. ज्या भागात सर्व्हे झाला आहे, त्यानुसार तब्बल ३०० वृक्षांचे नुकसान केले आहे. त्याबद्दल प्रति वृक्ष एक लाख रुपयांप्रमाणे तीन कोटींचा दंड वीज कंपनीकडून घेण्यात येणार आहे. पालिका वीज कंपनीला दंडाच्या आकारणीची नोटीस बजावून थेट आकारणी करणार आहे. त्यामुळे वीज कंपनीला वृक्षांच्या नुकसानीच्या तीन कोटींच्या दंडाचा निश्चित शॉक बसणार आहे.

‘‘वीज कंपनीने त्यांच्या कामासाठी वृक्षांच्या फांद्या तोडताना पालिका व पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, वीज कंपनीने ते केले नाही. पालिकेने काही भागात केलेल्या सर्व्हेनुसार ३०० वृक्षांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार वीज कंपनीला तीन कोटींच्या दंडाची नोटीस बजावून त्याची वसुलीही करत आहोत.’’

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

loading image
go to top