esakal | एसटीचे तीन हजार कर्मचारी वेतनाविना; दोन महिन्यांपासून दमडीही नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांना १३ प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत.

एसटीचे तीन हजार कर्मचारी वेतनाविना

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

गोडोली (सातारा) : गेल्या दिड वर्षापासून एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) आर्थिक कण्याला शासन टेकू देत नसले, तरी कोरोनामुळे (Coronavirus) सगळेच गणित कोलमडले आहे. कोरोनाची पहिली लाट संपते ना संपते तोच दुसरी लाट आली. त्यातून महामंडळाला प्रचंड तोट्याला सामोरे जावे लागत आहे. सध्या प्रवाशासाठी गावोगावी बस धावत असल्या, तरी गेल्या दोन महिन्यांपासून सातारा विभागातील तीन हजार १८८ कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. सणासुदीच्या दिवसात तरी थकित वेतनासह सर्व रक्कम मिळावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात सातारा, वाई, कोरेगाव, दहिवडी, फलटण, वडूज, कऱ्हाड, खंडाळा, पाटण, महाबळेश्वर व मेढा अशा ११ आगरांतून कारभार चालतो. त्यासाठी १,४९९ चालक, १,२८८ वाहक आहेत. ७६४ बसमधून प्रवाशांची वाहतूक सुरू असते. ४० गाड्या मालवाहू आहेत. २०८ तांत्रिक कर्मचारी, १९७ कार्यालयीन कर्मचारी, पाच भरारी पथके आहेत. या बसचा दररोज दीड लाख किलोमीटरचा प्रवास होतो. सर्व कर्मचाऱ्याच्या महिन्याच्या पगारासाठी नऊ कोटी ८७ लाख ८६ हजार रुपये लागतात. सध्या महामंडळाला तेवढे उत्पन्न मिळत नाही. त्यातच डिझेलचे वाढलेले दर व जुन्या गाड्यांमुळे डोकेदुखी झाली आहे. या सगळ्यांचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न परिवहनमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे आहे.

हेही वाचा: पुणे-बंगळूरु NH-4 महामार्गावर कर्नाटकचा तेलाचा ट्रक पलटी

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांना १३ प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत. या सवलतीत मोफत प्रवास मिळत असल्याने महामंडळाच्या तोट्याच भर पडत आहे. सध्या जिल्ह्याला महिनाभरात १० ते ११ कोटींचे डिझेल लागते. त्यातच प्रवासी कर साडेसतरा टक्के व वाढलेले टोलचे दर या सगळ्या आकडेमोडीत उत्पन्न व खर्चाचा मेळ बसताना दिसत नाही. त्यामुळे पैसा कुठून उभा करायचा, हा प्रश्न गंभीर आहे.

हेही वाचा: वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सिद्धार्थचा 'प्रवास'

टोल माफ, चांगल्या नवीन बसची सेवा देणे, शाळा सुरू झाल्यावर पासच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणे, खासगी वाहतुकीवर निर्बंध घालणे, जी. पी. एस. प्रणालीचा वापर करणे, ऑनलाइन तिकिटाची सोय व प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी सोयी- सवलती देणे, स्वच्छतागृहे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, असे या विभागातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. वेळेत विनाविलंब वेळेत गाड्या धावल्या तरच प्रवासी एसटीकडे वळतील. अन्यथा खासगी वाहनातून प्रवासाची सवय लागल्यास महामंडळाला आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे.

हेही वाचा: कुस्तीच्या आखाड्यासाठी 5 वर्षांनंतर सत्ताधारी-विरोधक 'एकत्र'

वस्तुस्थिती आणि उपाययोजना...

  • कोरोनामुळे प्रवासी संख्या रोडोवली

  • शाळा, कॉलेज बंद असल्याने उत्पन्नात घट

  • शासनाकडून टोल माफ

  • प्रवासी कर साडेसतरा टक्क्यांवरून कमी करावा

  • नवीन आधुनिक बस देणे

loading image
go to top