esakal | 48 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Mahabaleshwar

जुलै महिन्यात अतिवृष्टीने महाबळेश्वर तालुक्याचे मोठे नुकसान झाले.

48 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरु

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain Mahabaleshwar) आंबेनळी घाट (Ambenali Ghat) रस्त्याची दुर्दशा झाल्याने किल्ले प्रतापगड (Pratapgad Fort) परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला होता. तसेच हाच घाटरस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळण-वळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. आज या घाटरस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र ट्रक, एस.टी बस या सारख्या अवजड वाहनांना तूर्तास तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

जुलै महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने आंबेनळी घाटरस्त्याची मोठी दुर्दशा झाली. या घाटरस्त्यावर तीसहून अधिक ठिकाणी छोट्या-मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते, तर मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन कि.मी अंतरावर मुख्य रस्ता तीस फूट खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. यामुळे किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला होता. याबरोबरच हाच घाटरस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. गत दीड महिन्यापासून या घाट रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळून खाली आलेली माती, मोठमोठे दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. प्रामुख्याने तीस फूट खचलेला हा रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागावर होते.

हेही वाचा: ज्यांनी जंगलं नष्ट केली, त्यांचा 'सूड' घेण्यासाठी 80 किलोचे उंदीर रस्त्यावर

Ambenali Ghat

Ambenali Ghat

रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने या झालेल्या ठिकाणी भराव टाकून त्यानंतर रस्त्यावर जाळीचे बेड तयार करून, त्या बेडमध्ये दगड भरून खचलेला रस्ता जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरु होते. आजअखेर दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या घाटरस्त्यांचे काम पूर्णत्वास गेले असून या घाटरस्त्यावरील वाहतूक आज सुरु करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाच्यावतीने फलक देखील लावण्यात आले असून दुचाकी व चारचाकी वाहने प्रतापगडसह कोकणाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: कर्मचारी कपातीमुळे RT-PCR लॅबमध्ये 'गोंधळ'

या विभागातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मिटला आहे. तूर्तास एस.टी बस, ट्रक सारख्या अवजड वाहनांना मात्र अजूनही काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सोमवारी या घाटरस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, दिनेश पवार यांनी केली. आंबेनळी घाटरस्त्याच्या काम चांगल्यापद्धतीने व लवकरात-लवकर होऊन या भागातील जनतेला दिलासा देण्याबाबतचा पाठपुरावा आमदार मकरंद पाटील यांनी केला. या पूर्णत्वास रस्तेकामाची जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभरदरे, पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

loading image
go to top