esakal | कर्मचारी कपातीमुळे RT-PCR लॅबमध्ये 'गोंधळ'; 'सिव्‍हिल'मध्ये Corona चाचणीवर परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

RT PCR

कोरोना संसर्गाला जिल्ह्यात सुरवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू करण्याचा विचार पुढे आला.

कर्मचारी कपातीमुळे RT-PCR लॅबमध्ये 'गोंधळ'

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कोरोना काळात (Coronavirus) रुग्णांच्या निदानामध्ये महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील (Satara Hospital) आरपीसीआर लॅबच्या (RT PCR Lab) नियोजनात कर्मचारी कपातीमुळे सावळागोंधळ सुरू आहे. या स्थितीत नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे. कोरोनाबाधितांचे निदान व उपचार तातडीने व्हावेत, यासाठी ही लॅब योग्य पद्धतीने कार्यान्‍वित ठेवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्गाला जिल्ह्यात सुरवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू करण्याचा विचार पुढे आला. तत्पूर्वी चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागत होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे अहवाल मिळण्याचा वेळही कमी झाला. बाधितांवर तातडीने उपचार सुरू करण्यास मदत मिळाली. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने नवीन रक्तपेढीच्या इमारतीत कोरोना विभाग सुरू करण्यात आला. तेथे केसपेपरची सुविधा, वैद्यकीय अधिकारी, रॅट व आरटीपीसीआर चाचणीसाठीचे नमुने घेणे व त्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याला औषधे देण्याची सुविधाही देण्यात आली होती. या विभागात दररोज शेकडो नागरिकांची चाचणी घेण्‍यात येते. त्यांना तेथे योग्य पद्धतीने सेवा मिळत होती. परंतु, कर्मचारी कपातीच्या शासनाच्या धोरणामुळे या विभागात सावळागोंधळ सुरू आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवात साताऱ्यातून 150 जादा बस

कोरोना संसर्गामुळे आरोग्यसेवेवरील ताण वाढल्यामुळे शासनाने या विभागात मोठ्या प्रमाणात भरती केली होती. तंत्रज्‍ज्ञ, परिचारिका, डाटा ऑपरेटर, शिपाई अशा विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने लोकांना कामावर घेण्यात आले होते. मात्र, शासकीय दृष्‍टिकोनातून जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे कंत्राटी तत्त्‍वावर भरती केलेल्या लोकांना नुकतेच कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे आरटीपीसीआर लॅबबरोबरच जिल्ह्यातील सर्वच कोरोना केअर सेंटरमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. त्याचा प्रभाव जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागावरही पडला आहे. कर्मचारी कपातीमुळे पूर्वीच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. इतर कामांबरोबरच त्यांना स्वतंत्र कोरोना विभागातही काम करावे लागत आहे. त्यामुळे तंत्रज्‍ज्ञ वेळेवर उपलब्ध नाहीत. आले तरी, त्यांची तपासणीसाठी आलेल्या नागरिकांवरच चिडचिड होत आहे. आरटीपीसीआर लॅबमध्ये तंत्रज्‍ज्ञ नसल्यामुळेही गेला आठवडाभर एकंदर कामकाजात बिघाड झाला होता. त्यामुळे आठवड्याचे सर्व दिवस सुरू असणाऱ्या कोरोना विभागाचे कामकाज रविवारी (ता. ५) बंद होते. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या अनेक नागरिकांना माघारी जावे लागले.

हेही वाचा: ज्यांनी जंगलं नष्ट केली, त्यांचा 'सूड' घेण्यासाठी 80 किलोचे उंदीर रस्त्यावर

कोरोना संसर्गाची भीती कायम

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची भीती अद्याप कमी झालेली नाही. अजूनही दररोज पाचशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित समोर येत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुस्त होणे घातक ठरू शकते. कोरोना विभाग सक्षमपणे कार्यान्वित होण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

loading image
go to top