esakal | बहिणीला सांगून घराबाहेर पडलेला काेराेनाबाधित परतलाच नाही

बोलून बातमी शोधा

dead body
बहिणीला सांगून घराबाहेर पडलेला काेराेनाबाधित परतलाच नाही
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि. सातारा) : जिल्ह्यातील दोन कोरोना बाधितांनी (Covid 19 Patients) आत्महत्या करत आजाराला कंटाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Two Covid 19 Patients Died Satara Marathi News)

गणेशवाडी (ता. सातारा) येथील 65 वर्षांची ही व्यक्ती गेले 15 दिवसांपासून कोरोना आजाराने त्रस्त होती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे ते गावातील पाटक नावाच्या शिवारात गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांना शोधण्यासाठी घरातील लोक शिवारात गेले. त्या वेळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार राजू शिंदे पुढील तपास करत आहेत.

दुसरी घटना चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे घडली आहे. कऱ्हाड येथील एक 38 वर्षांचा भाऊ शुक्रवारी (ता. 30) चिंचणेर वंदन येथील बहिणीकडे आला होता. त्या वेळी त्याने केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. शनिवारी (ता. 1) पहाटे पाचच्या सुमारास बाथरूमला जातो, असे बहिणीला सांगून तो घराबाहेर गेला होता. तो परत आला नाही. त्यामुळे बहिणीने तालुका पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची माहिती रविवारी (ता. 2) तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. मंगळवारी चिंचणेर वंदन येथील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत नोंद करण्याची प्रक्रिया तालुका पोलिस ठाण्यात सुरू होती.

हेही वाचा: 'गोकुळमध्ये सत्तांतर'; महाडीकांच्या गोकुळात पाटील, मुश्रीफ जोडगोळीचा ऐतिहासिक विजय