esakal | प्रभारी कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागाचा कारभार; जिल्ह्यात फक्त चारच गटशिक्षणाधिकारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Zilla Parishad

प्रभारी कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागाचा कारभार

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) शिक्षण विभागाचे (Department of Education) काम पूर्णवेळ अधिकाऱ्यांविना सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी केवळ चार तालुक्यांत गटशिक्षणाधिकारी कार्यरत असून, उर्वरित सात तालुक्यांत प्रभारी कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागाचा कारभार सुरु आहे. याचबरोबर, जिल्हा परिषदेत चार उपशिक्षणाधिका‍ऱ्यांच्या जागाही रिक्त आहेत. परिणामी शिक्षण विभागाच्या कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर (Education Officer Prabhavati Kolekar) यांची बदली माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून झाली असून, त्यांचा तात्पुरता पदभार उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्याकडे देण्यात आला आहे. या विभागात कायमस्वरूपी नेमणूक कोणाची होणार, याची उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारीपदही रिक्त आहे. जावळी, कऱ्हाड, वाई, खंडाळा या चार तालुक्यांत गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. पाटण, कोरेगाव, खटाव, माण, फलटण, सातारा, महाबळेश्वर या सात तालुक्यांत गटशिक्षणाधिकारीपद रिक्त आहे. अनेक ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

हेही वाचा: उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण? राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्ह्यात सात तालुक्यांत एकावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहिल्याने काम संथगतीने होत आहे. याबाबत प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. सध्या जिल्हा परिषदेत अन्य विभागातील अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्पसंचालक, मनरेगा या कार्यालयात तीन वर्षे अधिकारी नव्हते. मात्र, या ठिकाणी नुकतीच अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. केवळ शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची कमतरता राहत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

हेही वाचा: 'डीपी'तील 122 विद्यार्थ्यांना नोकरीची 'प्लेसमेंट'

शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरात-लवकर रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ही पदे भरेपर्यंत शिक्षण विभागाच्या कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नाही.’’

-मानसिंगराव जगदाळे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

loading image
go to top