esakal | आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल; ठाकरे सरकारला मनसेचा इशारा

बोलून बातमी शोधा

Doctor vaduj

उपचारापासून मृतदेह उचलन्यापर्यंत सर्व वैद्यकीय अधिकारीच करतात

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे काम करावे लागत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर शहर परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ होऊ लागल्यानंतर गेल्या आठवड्यात हे कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

येथे 30 ऑक्‍सिजन बेड सुरू करण्यात आले आहेत. सध्या येथे एक वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे चार वैद्यकीय अधिकारी, सात परिचारिका, एक सफाई कामगार, तीन सुरक्षा रक्षक, दोन औषध निर्माते, एक प्रयोगशाळा सहायक असा अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.

सध्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच रुग्णसेवेसंदर्भात बहुतांश कामे करावी लागतात. सोमवारी (ता. 19) सायंकाळी एक कोरोनाबाधित महिला दगावली. त्या वेळी वडूज नगरपंचायतीची शववाहिका कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात कर्मचारीच नसल्याने शववाहिकेत मृतदेह ठेवण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. मंगळवारी (ता. 20) सकाळी या मृत महिलेच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्याला मदतीला घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच पुरेशी दक्षता घेत स्वत: तो मृतदेह शववाहिकेत ठेवला. कोरोनाबाधित मृतदेह पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी तास न्‌ तास शवविच्छेदन गृहात राहात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे.

वडूज, औंध येथे कोरोना सेंटर सुरू करण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार कोविड सेंटर सुरू झाले. मात्र, आता याठिकाणी पुरेशा वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. शासनाने या ठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.

नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता