esakal | सातारा: सदस्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ संतप्त; ढेबेवाडीत खडाजंगी
sakal

बोलून बातमी शोधा

सदस्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ संतप्त; ढेबेवाडीत खडाजंगी

सदस्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ संतप्त; ढेबेवाडीत खडाजंगी

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : येथील ग्रामसभेला सातपैकी पाच ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिल्याने उपस्थित ग्रामस्थांनी त्याबद्दल सभेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत निषेधही केला. ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार, केवळ चर्चेपुरतेच राहिलेले आणि प्रत्यक्षात न आलेले शुद्ध पाणीपुरवठ्याचे एटीएम, अडवलेला रस्ता आदी प्रश्नीही यावेळी जोरदार चर्चा झाली.

हेही वाचा: कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

सरपंच विजय विगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सदस्य विजय कारंडे, वंदना चव्हाण, ग्रामसेवक नेताजी पवार, पोलिस पाटील विजय लोहार आदी उपस्थित होते. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सोमनाथ पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित कडव आदींनी सभेत काही प्रश्न उपस्थित केले. गावातील एका रस्त्याला निधी उपलब्ध झालेला असतानाही काहीजण त्याला विरोध करत आहेत.

हे पूर्ण चुकीचे असून, विरोध करणाऱ्यांवर प्रसंगी कायदेशीर कारवाई करून रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली. सभेला सातपैकी पाच सदस्य गैरहजर असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेले सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहात नसल्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? असा सवालही उपस्थित करण्यात आला. गावातील पाणीप्रश्नी सभेत चर्चा होऊन आश्वासनातले शुद्ध पाण्याचे एटीएम प्रत्यक्षात येणार आहे की नाही?

अशी विचारणा पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर सभेत ग्रामस्थांनी टीका करत हा कारभार सुधारून विभागातून वैद्यकीय उपचारासाठी ढेबेवाडीत येणाऱ्या रुग्णांना चांगली वैद्यकीय उपचार सुविधा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

रिक्त जागा भरून सोयी-सुविधा देण्याबाबत ग्रामपंचायतीमार्फत संबंधित विभागाकडे रितसर मागणी करण्यात येणार असल्याचे सरपंच विजय विगावे यांनी सांगितले. सभेत इतरही काही विषयांवर चर्चा होऊन काही ठरावही करण्यात आले.

loading image
go to top