
एकीचे बळ! बोंबाळेत गावकऱ्यांनी उभारले विलगीकरण कक्ष
कातरखटाव (जि. सातारा) : बोंबाळे (ता. खटाव) हे गाव कोरोना हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. सध्या गावात सत्तरहून अधिक बाधित रुग्ण आहेत. बाधितांमध्ये वयोवृद्धांबरोबर तरुणांचीही संख्या वाढत आहे. याच गावातील काही दानशूरांसह काही युवकांनी पुढाकार घेत येथील मराठी शाळेत दहा बेडचे विलगीकरण केंद्र सुरू केले.
शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळेच्या दोन खोल्या ग्रामस्थांनी ताब्यात घेतल्या. दोन खोल्यांमध्ये दहा बेडचे नियोजन केले. एक खोली महिला रुग्णांना, तर एक खोली पुरुष रुग्णांना असे नियोजन केले. बाधित कुटुंबातील रुग्णांना आपल्या घरी विलगीकरणाची सोय नाही, अशा वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
शौचालयास व इतर कामास लागणाऱ्या खर्चाच्या पाण्याची सोय गावातील काही लोकांनी टॅंकरव्दारे केली. बाधित कुटुंबातील लोकांनी बाधित नातेवाईकास जेवणाचा डबा पोच करण्याचा निर्णय घेतला. सरपंच रेश्मा निंबाळकर, उपसरपंच बालाजीशेठ निंबाळकर, सदस्य गणेश निंबाळकर, गोरख निंबाळकर, महेश निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, प्रशांत निंबाळकर, दत्तात्रय घोरपडे, अभय शिंदे, प्रदीप निंबाळकर आदींनी पुढाकार घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केले. कातरखटावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बोंबाळे उपकेंद्रातील डॉ. मनोज निंबाळकर, डॉ. लीना गुरव, आरोग्य सेविका धोंडुबाई गोसावी, आशा स्वयंसेविका अर्चना नलवडे, नलिनी नलवडे यांच्याकडे या रुग्णांची देखभाल करण्याची जबाबदारी दिली.
इतर गावांतही विलगीकरण कक्ष सुरू करा
गावामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोणी कोणाची काळजी घ्यावी, हेसुद्धा कळत नाही. गावानेच गावकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, या उदात्त हेतूने गावकऱ्यांनी गावातच विलगीकरण कक्ष असावे, असा निर्णय घेतला व तो पूर्णत्वास नेला. इतर गावांनीही अशा प्रकारे विलगीकरण कक्ष सुरू केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी माहिती बोंबाळेचे ग्रामस्थ दत्तात्रय घोरपडे यांनी दिली.
'ग्रामस्थांनाे! कोरोनात तरी राजकारण बाजूला ठेवा'
कोरोनामुक्ती 88.25 टक्क्यांवर; कऱ्हाडात दाेन टक्केच बाधित
Web Title: Villagers Donated Corona Care Center Katarkhatav Satara Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..