
कुसूर: सहा महिन्यांपूर्वी सिलिंडरच्या स्फोटात लागलेल्या आगीत अखंड घर जळाले. त्यातून सावरत असतानाच कुटुंबातील तानाजी कणसे या कर्त्या पुरुषाचे निधन झाले. विंग (ता. कऱ्हाड) येथील कणसे कुटुंबीयांपुढे दुःखाचा डोंगर उभा राहिला. संसार उघड्यावर पडला. दुर्दैवाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. घर बांधकामासाठी आर्थिक आवाहनाला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. एक हात मदतीचा उपक्रमात एक लाखाची मदत गोळा करण्यात यश आले आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी ठरत आहे.