आरोग्य केंद्रासाठी आत्मदहनाची वेळ येऊ देऊ नका; युवकांचा प्रशासनाला गर्भित इशारा

जयंत पाटील
Sunday, 27 September 2020

कोपर्डे हवेली येथील आरोग्य उपकेंद्राची जुनी इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर असून, त्यामध्ये सुविधा कमी आहेत व जागाही अपुरी आहे. सुविधा नियुक्त नवीन उपकेंद्राच्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने सीटी सर्व्हे नंबर 869 व 870 या जागेचा ठराव द्यावा. ग्रामपंचायतीकडे गेल्या दीड वर्षापासून आरोग्य उपकेंद्राच्या जागेसाठी ठराव मागूनही ग्रामपंचायत व पदाधिकारी दखल घेत नसल्यामुळे साखळी आंदोलन सुरू करण्यात आले.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील आंदोलनकर्ते शिवाजी चव्हाण, शैलेश चव्हाण, विवेक चव्हाण, स्वप्नील चव्हाण यांनी राज्य शासनाच्या नावे असणारी जागा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे नावे होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत शिफारस करावी. याबाबत प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई न केल्यास जिल्हा परिषद मुख्य इमारतीसमोर एक ऑक्‍टोबर रोजी आत्मदहन करू, असा इशारा निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की कोपर्डे हवेली येथील आरोग्य उपकेंद्राची जुनी इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर असून, त्यामध्ये सुविधा कमी आहेत व जागाही अपुरी आहे. सुविधा नियुक्त नवीन उपकेंद्राच्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने सीटी सर्व्हे नंबर 869 व 870 या जागेचा ठराव द्यावा. ग्रामपंचायतीकडे गेल्या दीड वर्षापासून आरोग्य उपकेंद्राच्या जागेसाठी ठराव मागूनही ग्रामपंचायत व पदाधिकारी दखल घेत नसल्यामुळे अखेर 19 सप्टेंबरपासून साखळी आंदोलन सुरू करण्यात आले. 

ऐन कोरोनात रेशनवर धान्यटंचाई; एपीएलचे धान्य केले बंद!

आंदोलन सुरू असल्यापासूनची कल्पना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु, अद्याप याबाबत अधिकाऱ्यांकडून दखल घेतली नाही. त्यामुळे सध्या साखळी आंदोलन सुरू आहे. ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. प्रशासनाने आंदोलनाची योग्य दखल न घेतल्यास एक ऑक्‍टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर शिवाजी चव्हाण, शैलेश चव्हाण, अमित पाटील, किशोर साळवे आदींनी प्रशासनास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. संबंधित विभागांना मेलव्दारे निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Agitation For Space At Koparde Haveli Satara News