सायटेक : माशांपासून ‘जैविक प्लॅस्टिक’!

Lyusi
Lyusi

प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. प्लॅस्टिक वापरावर बंदी, विघटनासाठी जीवाणूंचा वापर, एकदा वापरण्यायोग्य प्लॅस्टिकवर बंदी असे अनेक उपाय योजले जात आहेत; परंतु ते तोकडेच पडत आहेत. आता पारंपरिक प्लॅस्टिकला पर्याय ठरेल असे जैविक प्लॅस्टिक तयार करण्यात यश आले आहे.

महाराष्ट्रात दररोज किमान १८ हजार टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो. त्यातील निम्म्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. उर्वरित कचरा तसाच साचत राहतो. मग तो कुठल्या तरी गटारीत, प्राण्यांच्या पोटात, नद्यांमध्ये, समुद्रात वाहत जातो. त्याचे काय गंभीर परिणाम होतात हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. ही झाली केवळ महाराष्ट्रातील स्थिती. भारतातील प्रत्येक राज्याचा विचार केला तर ही समस्या किती पटींनी वाढली आहे याची कल्पना येईल. भारत आणि चीनच्या समुद्रात गोळा होणारा लाखो टन कचरा अमेरिकेपर्यंत पोहोचतो आहे व त्याचा अमेरिकेला फटका बसतोय, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच केले होते. एकुणात काय, तर प्लॅस्टिकचा कचरा रोखणे आता हाताबाहेर चालले आहे. याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न झाले; पण ते अपुरे ठरत असल्याचे दिसतेय, त्यामुळे प्लॅस्टिकला पर्याय शोधण्याचे काम शास्त्रज्ञांनी सुरू केले आहे. त्यात ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी आघाडी घेतली आहे. 

मासे पकडण्यासाठी गळाला लावलेल्या आळ्याची भरलेली टोपली किंवा मासे कापल्यानंतर उरलेल्या भागांच्या ढिगाकडे सर्वसामान्यांना कदाचित पाहवणारही नाही; परंतु मत्स्य प्रक्रिया प्रकल्पामध्ये माशांच्या ‘कचऱ्या’मध्ये नव्या उत्पादनासाठी संधी असल्याचे ल्युसी ह्युजेस यांना वाटले. ज्या गोष्टी नागरिक फेकून देतात, त्यापासून चांगल्या वस्तू किंवा पदार्थ तयार करण्यात ल्युसी यांना रस वाटतो. त्या ससेक्‍स विद्यापीठात ‘प्रॉडक्‍ट डिझाइन’ विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. दक्षिण इंग्लंडमधील किनारपट्टीवरील मत्स्य प्रक्रिया उद्योगाला भेट दिल्यानंतर वाया जात असलेल्या माशांच्या अवयवांचा काय उपयोग करता येऊ शकतो, असा विचार घोळू लागला. त्यातून त्यांनी प्लॅस्टिकसारखा पदार्थ तयार करण्यात यश मिळवले. माशांचे खवले, त्वचा आणि टाकून दिलेले इतर भाग यांच्यापासून हा प्लॅस्टिकसारखा पदार्थ तयार केला आहे. मुख्य म्हणजे हे नवे प्लॅस्टिक जैविक घटकांत विघटनशील आहे.

माशांच्या खवल्यांपासून तयार केलेल्या या पदार्थाचे नामकरण ‘मरिना टेक्‍स’ असे करण्यात आले आहे. या संशोधनाला या वर्षीचा जेम्स डायसन पुरस्कार देण्यात आला आहे. तीस हजार पौंडांचा हा पुरस्कार आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या समस्यांवर आपल्या कल्पनाशक्ती व हुशारीने उपाय शोधणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो. ल्युसी या केवळ २४ वर्षांच्या आहेत व २८ देशांतील १०७८ जणांना मागे टाकून त्यांनी हा पुरस्कार मिळविला आहे. 

ल्युसी यांचा जन्म लंडनच्या एका उपनगरात झाला. समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवणे त्यांना कायम आवडते. प्रॉडक्‍ट डिझायनिंगची पदवी त्यांनी या वर्षी मिळविली. पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपैकी ४० टक्के प्लॅस्टिक केवळ एकदाच वापरले जाते, तसेच २०५०पर्यंत माशांच्या वजनापेक्षा जास्त प्लॅस्टिक समुद्रात असेल, असा अंदाज वर्तविला जातोय याची माहिती झाल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या. त्यातून प्लॅस्टिकला पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. समुद्रातच उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून काय पदार्थ तयार करता येईल याची चाचपणी त्यांनी सुरू केली. माशांचे खवले, समुद्री शैवाल आणि शेलफिशचे कवच यांच्यावर त्यांनी प्रयोग सुरू केले. सुमारे १०० प्रकारच्या पर्यायांवर त्यांनी काम केले. ग्लोबल बायोप्लॅस्टिक कम्युनिटीमध्ये काम करणाऱ्यां शास्त्रज्ञांशीही त्यांनी चर्चा केली. शेवटी लाल शैवालाचा वापर सर्व पदार्थ बांधून ठेवण्यासाठी होऊ शकेल, या निष्कर्षाप्रत त्या आल्या. त्यातून त्यांनी अर्धपारदर्शी व प्लॅस्टिकला पर्याय ठरू शकेल अशा पदार्थाची निर्मिती केली. 

माशांचे खवले, त्यांची त्वचा, इतर फेकून दिलेले अवयव आणि लाल शैवाल यांच्या मिश्रणातून तयार झालेला पदार्थ अर्धपारदर्शी, लवचिक होता, तसेच त्याची काठिण्य पातळीही चांगली होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सहा आठवड्यांत त्याचे जैविक घटकांत विघटन होते. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून जे जैविक प्लॅस्टिक याआधी तयार झाले आहे, त्याचे विघटन करण्यासाठी ‘इंडस्ट्रीयल कंपोस्टर’ची गरज भासते. एका अटलांटिक कॉड फिशपासून १४०० मरिना टेक्‍स पिशव्या तयार होऊ शकतात, असा ल्युसी यांचा दावा आहे. व्यावसायिक स्तरावर याचे उत्पादन घेण्यासाठी ल्युसी यांना सरकारच्या मदतीची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com