गिरीराज सिंह यांनी सादर केले 'वातानुकूलित जॅकेट'

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

या जॅकेटच्या आत थंड आणि गरम हवा देणारे बॅटरीवर चालणारे पंखे बसविण्यात आले आहेत. जॅकेटवर लाल आणि हिरव्या रंगाची दोन बटणे आहेत. लाल बटन तापमान वाढविण्यासाठी तर हिरवे बटन तापमान कमी करण्यासाठी आहे

पाटणा (बिहार) - आधुनिक तंत्रज्ञानाचा अद्‌भूत पद्धतीने वापर करत तयार करण्यात आलेले वातानुकूलित जॅकेट (एसी जॅकेट) सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी मंगळवारी सादर केले.

सिंह यांनी बिहारमधील त्यांच्या खानवा मतदारसंघात या 'एसी जॅकेट'चे उद्‌घाटन केले. "हे जॅकेट म्हणजे कॉटन आणि तंत्रज्ञानाचा मिश्रण आहे. सैनिकांसाठी हे जॅकेट वरदान ठरणार आहे. लवरकच हे जॅकेट बाजारात उपलब्ध होईल', अशी माहिती सिंह यांनी यावेळी बोलताना दिली. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी हे "एसी जॅकेट' तयार केले आहे. सिंह यांनी यापूर्वी सौर ऊर्जेवर चालणारा सोलर चरखा सादर केला होता.

कसे काम करते "एसी जॅकेट'?
या जॅकेटच्या आत थंड आणि गरम हवा देणारे बॅटरीवर चालणारे पंखे बसविण्यात आले आहेत. जॅकेटवर लाल आणि हिरव्या रंगाची दोन बटणे आहेत. लाल बटन तापमान वाढविण्यासाठी तर हिरवे बटन तापमान कमी करण्यासाठी आहे. उष्ण राजस्थानपासून सियाचीनसारख्या थंड ठिकाणापर्यंत हे जॅकेट उपयुक्त ठरणार आहे.

जॅकेटची किंमती किती?
हाफ आणि फुल अशा दोन प्रकारात हे जॅकेट बनविण्यात आले आहे. हाफ जॅकेटची साधारण किंमत 18 हजार रुपये तर फूल जॅकेटची किंमत 25 हजार रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AC jacket launched by Central