...आणि भाताच्या पेंढ्यावर बस धावली!

...आणि भाताच्या पेंढ्यावर बस धावली!

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. दिनांक १४ ऑगस्ट २०१६, सकाळची सुमारे ११.०० वाजण्याची वेळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मा. मनोहर पर्रीकर यांनी संयुक्तपणे झेंडा दाखविला. आणि पुणे महानगपालिकेची बस बायोसीएनजी (BO-CNG) या इंधनावर चालू लागली. भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार अशा प्रकारच्या दुसऱ्या पिढीतल्या जैवइंधनावर आधारित वाहनांसाठी वापरता येणाऱ्या बायो-सीएनजीच्या भारतातल्या पहिल्या पंपाचे औपचारिक उदघाटन झाले!
पुणे शहरापासून सुमारे १० कि.मी. अंतरावर, पौड रोडवरील पिरंगुट येथे ‘प्रायमुव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि.’ या कंपनीने विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित या पंपावर बायोसिएनजी इंधनाची विक्री चालू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ६०० पेक्षा जास्त वाहनांमध्ये या इंधनाचा वापर केला आहे. आजपर्यंत एकही तक्रार नोंदवलेली नाही आणि बहुतांश ग्राहक वारंवार हे इंधन वापरत आहेत.

सक्षम तंत्रज्ञान : 
गायी-म्हशींच्या शेणापासून तयार होणारा गोबर गॅस बहुतांना परिचित असेल. घरगुती स्वयंपाकासाठी अशा प्रकारची सुमारे ४० लाख संयंत्रे देशात बांधली गेली आहे. धुरमुक्त अशा निळ्या ज्योतीचा स्वयंपाक याद्वारे करता येतो. या जैववायुमध्ये सुमारे ५५-६०% मिथेन (CH4) नावाचा ज्वलनशील वायू असतो. तसेच ४०-४५% कार्बन डायऑक्साईड (CO2) नावाचा अज्वलनशील वायु असतो. याशिवाय अत्यल्प प्रमाणात म्हणजे १% पेक्षा कमी हायड्रोजन सल्फाईड (H2S) हा वायू असतो. त्यामुळे गोबर गॅसला कुजकट वास येतो.
पुणे - मुंबई - दिल्लीसारख्या शहरांमध्ये रिक्षा, बस चालवण्यासाठी जो सीएनजी गॅस मिळतो, त्यामध्येही ९०% हा मिथेन वायूच असतो. त्यामुळे शेणाच्या गोबर गॅसमधील मिथेन गॅस वेगळा काढला आणि उच्चदाबाने गाड्यांमध्ये भरला तर त्याद्वारेही बस चालू शकते. शहरांमध्ये गायी-म्हशी आणि शेणाची उपलब्धता नसल्यामुळे अशा प्रकारच्या सीएनजी गॅसची निर्मिती करता येत नाही.

गायीच्या पोटात आणि गोबर गॅस संयंत्रात जो वायू तयार होतो, तो मुख्यतः दोन प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो. ‘अॅसिडोजेन’ प्रकारचे जिवाणू जैवभावाचे (Biomass) ऑरगॅनिक अॅसिडमध्ये रुपांतरण करतात आणि दुसरे ‘मिथेनोजेन’ नावाचे जिवाणू या ऑरगॅनिक अॅसिडचे मिथेन (CH4) आणि कार्बनडाय ऑक्साईड (CO2) या वायूंमध्ये रुपांतरण करतात. ही सर्व प्रक्रिया ऑक्सिजन विरहीत संयंत्रामध्ये होते व ज्वलनशील मूल्य असणारा मिथेन वायू आपणाला उपलब्ध होतो.
गेली १०-१२ वर्षे संशोधन करून आम्ही एक अशी प्रक्रिया विकसित केली, की ज्यामध्ये वरती उल्लेख केलेले अॅसिडोजेन आणि मिथेनोजेन हे जिवाणू थेट वापरता येतात व याद्वारे जैवभारावर (Biomass) आधारित बिनगायीचा, बिनशेणाचा जैववायू (Biogas) तयार करता येतो!

पिष्टमय पदार्थ (Starch) आणि शर्करा (Sugar) हे पदार्थ जिवाणूंना पचवायला खूप सोपे असतात. यापासून जो बायोगॅस तयार होतो, त्याला ‘पहिल्या पिढीचे’ जैवइंधन म्हणतात. मात्र हे पिष्टमय पदार्थ आणि शर्करा हे माणसासाठीही अन्न म्हणून आवश्यक आहे. उदा. मक्याच्या दाण्याचा उपयोग करून इथेनॉल तयार करायचे व त्यावर गाड्या चालवायच्या का हा मका माणसांना खाण्यासाठी ठेवायचा असे एक सामाजिक द्वंद निर्माण होते.
सेल्यूलोज, हेमी सेल्यूलोज आणि लिग्नीन यापासून जैवइंधन तयार केले तर याला दुसऱ्या पिढीचे इंधन म्हणतात. उदा. उसाचा बगॅस. हा बगॅस माणूसही खात नाही आणि जनावरेही खात नाहीत. तो बॉयलरमध्ये जाळून पाण्याची वाफ केली जाते. आम्ही केलेल्या संशोधनामध्ये हा बगॅस व इतर तत्सम पदार्थ वापरून त्यांचा एका दिवसात बायोगॅस तयार करता येतो व पुढे विशिष्ठ प्रकारच्या वायूंची चाळणी वापरून, त्यातून मिथेन वायू वेगळा काढून बायोसीएनजी तयार करता येतो. अन्नसुरक्षा का उर्जा सुरक्षा हे द्वंद यामध्ये निर्माणच होत नाही.

भारत सरकारच्या पेट्रोलियम, एक्स्पेसिव्ह अँड सेफ्टी ऑरगनायझेशन (PESO) खात्यांतर्गत बायोसीएनजीसाठी १५ः१६०८७ हे नवे मानक आजच्या सरकारने तयार केले आहे. नागपूरच्या चीफ कंट्रोलर ऑफ एक्स्पोसिव्हसतर्फे देण्यात येणारी बायो सीएनजीच्या पंपाची भारतातील पहिली मान्यता आमच्या पिरंगुट येथील पंपाला मिळाली आहे. ज्यामुळे औपचारिकपणे आम्ही रोज बायोसीएनजी हा दुचाकी, रिक्षा, कार वा बसमध्ये भरू शकतो. पेट्रोल व डिझेलला १००% पर्याय हा गवतापासून तयार केलेल्या बायोसीएनजीने सिद्ध केला आहे.

चिरंजीवी पर्यावरण :
हवेतील कार्बनडाय ऑक्साईड जमिनीतील पाणी आणि सूर्यप्रकाशातील उर्जा घेऊन, झाडांच्या पानांमधील क्लोरोफील हे शर्करा (ग्लोकोज) तयार करते आणि संपूर्ण झाडच यामधून तयार होते. याच झाडातील सेल्यूलोजचा वापर करून आपण मिथेन - बायोसीएनजी तयार करतो. मिथेन जाळल्यावर त्याचा कार्बनडाय ऑक्साईड तयार होतो व प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये झाड या कार्बनडाय ऑक्साईडचे पुन्हा सेल्यूलोज तयार करते. या चक्राला ‘कार्बन न्यूट्रल’ चक्र म्हणतात. हे चक्र हजारो - लाखो वर्षे असेच चालू राहू शकते. जागतिक तापमानवाढीला कारणूत होणारे कोणतेही वायू यामध्ये तयार होत नाहीत. बायोसीएनजी या जैवइंधनाला युनायटेड नेशन्सने मान्यताप्राप्त केलेले ‘कार्बन क्रेडीट’स उपलब्ध होतात.
जागतिक तापमानवाढीसंदर्भात झालेल्या पॅरिस कराराचा भारत एक सदस्य आहे. बायोसीएनजी या जैवइंधनाचा वापर करणे हा या जागतिक प्रश्नावरील एक उपाय असू शकतो. नव्याने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचे स्वामित्व हक्क आज भारताकडे आहेत. या तंत्रज्ञानाची उपलब्धता जगातील इतर देशांना करून देणे ही भारतातर्फे जगाला देण्यात येणारी तंत्र देणगी असू शकेल. पृथ्वी गार करून देण्याची ताकद या बायोसीएनजीमध्ये आहे!

आथिर्क व्यवहार्यता :
कोणत्याही उद्योगाच्या यशस्वीतेमागे आर्थिक व्यवहार्यता हा सर्वांत महत्त्वाचा मापदंड असतो. बायोसीएनजी या विषयात एकूण तीन घटक महत्त्वाचे आहेत. बायोमास जैवभार उपलब्ध करून देणारा शेतकरी, बायोसीएनजी तयार करून विक्रीस उपलब्ध करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची गुंतवणूक करणारा उद्योजक आणि बायोसीएनजी वापरणारा ग्राहक हे होय.
भाताचा पेंढा, गव्हाचे तूस, कापसाच्या फराट्या, तुराट्या-----, उसाचा बगॅस, सोयाबीनचे कुटार, केळीचे खुंट, फुलांची देणे. निर्माल्य, नारळाची शहाळी, सर्व प्रकारची गवते, पालापाचोळा असे सर्व कृषि अवशेष बायोसीएनजीकरता वापरता येतात. या सर्व टाकावू वस्तूंना रास्त भाव मिळू शकतो. साधारणतः रु. १,५०० ते रु. २,५०० प्रती टन (कोरडा माल) अशी किंमत असू शकते.
हल्ली गवत वा बांबूसारख्या गोष्टींची उर्जा शेती करून बायोमास उपलब्ध करून दिला तर एकरी वर्षाला रु. पन्नास हजारांचे हमखास उत्पन्न मिळू शकते.
भांडवली गुंतवणुकीच्या योग्य गणितासाठी ५-१० वा २५ टन बायोसीएनजी प्रती दिवशी विक्री करेल असा प्लांट उभा करावा लागेल. विकसित झालेले तंत्रज्ञान इतके आखीव-रेखीव व साचेबंद आहे, की गुंतवणूकदाराला भांडवलाचा परतावा ३ ते ४ वर्षांत मिळेल.
ग्राहकाला बायोसीएनजीचा विशेष आर्थिक फायदा आहे. सध्या आपण बायोसीएनजी रु. ५० ते ६०/-प्रती किलो दराने विकतो. पेट्रोलच्या समतुल्य किमतीच्या मानाने ही किंमत जवळपास निम्मी आहे! पुण्यातील रिक्षेवाले पेट्रोल न भरता २-३ तास रांगेत उभे राहून सीएनजी भरतात. यामागे आर्थिक फायदा हे रहस्य आहे.

सामाजिक बांधिलकी :
काही वर्षांपूर्वी बोलताना मा.नितीनजी गडकरी म्हणाले होते, ‘‘संतोष, आमच्या विदर्भातला शेतकरी आत्महत्या करून राहिलाय. तुम्ही असे काहीतरी संशोधन करा, की त्याच्या शेतमालाला रास्त व जास्त भाव मिळेल.’’
बायोमासवर आधारित जैवइंधन हा या प्रश्नावरील एक हमखास उपाय असेल. बायोसीएनजी हे याचेच एक उत्तर आहे.
सध्या भारत, मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांकडून दरवर्षी सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे क्रूड ऑईल आयात करतो. दरवर्षी हे सर्व पैसे देशातील शेतकऱ्याला, आदिवासी समाजाला उपलब्ध होऊ शकतात. कारण बायोसीएनजी हा पेट्रोल, डिझेल, एलपीजीला १००% पर्याय आहे. जैव इंधनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. ऊन, पाऊस, जमीन यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा सुयोग्य वापर करून ग्रामीण भागातील दारिद्र्याचे समूळ उच्चाटन करणे बायोसीएनजी या जैवइंधनाद्वारे होऊ शकते असा विश्वास मला वाटतो. आपण सर्वांनी मिळून हे आव्हान पेलायला हवे.

- संतोष गोंधळेकर
मो. नं. : ९८२२०३८२२२
santoshgo@gmail.com
संचालक, प्रायमुव्ह इंजिनिअरिंग प्रा. लि.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com