esakal | नोकियातील अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं? 
sakal

बोलून बातमी शोधा

नोकियातील अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं? 

स्पर्धेत टिकाव लागला नाही म्हणून जगप्रसिद्ध नोकिया कंपनी नेस्तनाबूत झाली. एकाच शहरातील कंपनीच्या ऑफिसमधील तीन हजारांवर कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. कंपनीबरोबर संपूर्ण फिनलॅंड देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. कंपनीचे जगभरातील लाखो कर्मचारी अन्य कंपनीत नोकरीला गेले. उरलेल्या दीड हजार कर्मचाऱ्यांना अन्य देशांत नोकरीला जा; अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे कंपनीने सांगितले...मग या अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं? 

नोकियातील अखेरच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी काय केलं? 

sakal_logo
By
नानासाहेब थाेरात

सातारा ः धरसोड वृत्ती आणि मानसिक गोंधळामुळे सुमारे नव्वद टक्के तरुण नोकरीत वा धंद्यात स्थिर राहात नाहीत. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत कोलांट्याउड्या मारण्याची त्यांना सवयच लागलेली असते. असे सवयीचे गुलाम झालेले अनेक तरुण कधीच शांत, समाधानी व स्थिर राहात नाहीत. हाती चांगली नोकरी असतानाही ती लाथाडून आणखी मोठ्या वेतनाची नोकरी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
 
माझ्या काही मित्रांनी तर तीन-तीन महिन्यांत नोकऱ्या बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणही मोठ्या उत्साहाने एखादा उद्योग-धंदा सुरू करतात आणि चार-सहा महिन्यांतच जम बसण्याआधी डाव उधळून टाकतात. पुन्हा नव्याने दुसरा उद्योग-धंद्या सुरू करतात. त्यांना लगेच स्वप्नवत यश हवे असते. ते प्राप्त होत नाही, तसेच एखाद्या कंपनीतील नोकरी गेल्यास, नोकरीतून कमी केल्यास अपेक्षाभंग होऊन अनेक तरुण नैराश्‍याच्या गर्तेत बुडून जातात.
 
मात्र मित्रांनो, जगभराला मोबाईल हॅंडसेट पुरविणारी युरोपमधील फिनलंडस्थित नोकिया कंपनी सर्वांना ज्ञात आहे. वर्षाकाठी पन्नास हजार कोटींची उलाढाल. दीडशे देशांत लाखापेक्षा अधिक कर्मचारी. फिनलंड देशाची चार टक्के अर्थव्यवस्था तिच्या हाती; पण काळाच्या ओघात कंपनीचे प्रतिस्पर्धी वरचढ झाले. स्पर्धेत टिकाव लागला नाही. सगळे प्लॅन फसले. वर्षभरात कंपनी नेस्तनाबूत झाली. एकाच शहरातील कंपनीच्या ऑफिसमधील तीन हजारांवर कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. कंपनीबरोबर संपूर्ण फिनलंड देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. कंपनीचे जगभरातील लाखो कर्मचारी अन्य कंपनीत नोकरीला गेले. उरलेल्या दीड हजार कर्मचाऱ्यांना अन्य देशांत नोकरीला जा; अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे कंपनीने सांगितले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांनी ना माघार घेतली, ना देश सोडला, ना आत्महत्या केली!
 
फिनलॅंडमध्ये 1865 मध्ये स्थापन झालेली नोकिया कंपनी 2010 पर्यंत जगातील सर्वात मोठी मोबाईल फोन उत्पादक कंपनी होती. अचानक सारे काही बदलले. कंपनीला नवीन जगाशी जुळवून घेता आले नाही आणि या धावत्या जगात ती कधी लुप्त झाली ते समजले पण नाही. फिनलॅंडची राजधानी हेलसिंकी येथील कंपनी मुख्यालयातील सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना नोकियाच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी अमेरिका, जपान, कोरियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले; पण त्यांनी त्या नाकारल्या. बुडत्या जहाजाच्या कॅप्टनप्रमाणे कर्मचाऱ्यांनी अखेरपर्यंत कंपनीची साथ सोडली नाही. अखेरचा निरोप घेऊन ते सगळे जण फिनलॅंडच्या कानाकोपऱ्यात निघून गेले. जातानाच त्यांनी पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचे ठरवले. त्याचाच परिपाक म्हणून अवघ्या पाचच वर्षात फिनलॅंड देशात फिनिक्‍ससारखी भरारी घेतली. इतर कोणत्याही कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे नसलेले कौशल्य त्यांच्याकडे होते. त्याचा वापर करून संपूर्ण फिनलॅंडमध्ये दोन वर्षांतच तीन हजारांपेक्षा जास्त स्टार्ट-अप कंपन्या स्थापन केल्या. एका स्टार्ट-अप कंपनीत किमान दहा लोकांसाठी नोकऱ्या निर्माण झाल्या. त्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी फक्त दोन वर्षांतच फिनलॅंडच्या कानाकोपऱ्यात तीस हजार नोकऱ्या निर्माण केल्या. संपूर्ण शिक्षण व्यवस्था आणि नोकरीची कल्पनाच बदलवून टाकली. नवीन नोकऱ्याच नाही, तर तरुणांमध्ये कौशल्यावर आधारित छोटे-छोटे उद्योग निर्माण करायची प्रेरणा निर्माण केली. जगातील टॉपच्या दोनशे कॉम्प्युटर गेम फिनलॅंडमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.
 
नोकिया जरी संपली असली, तरी जगातील सर्व मोबाईल कंपनींना टेक्‍नॉलॉजी सपोर्ट करणाऱ्या छोट्या कंपन्या या फिनलॅंडमधीलच आहेत. नोकिया संपल्यामुळे फिनलॅंडची जेवढी अर्थव्यवस्था कोलमडली त्याच्या तिप्पट अर्थव्यवस्था या कर्मचाऱ्यांनी उभी केली. आज संपूर्ण जगामध्ये फिनलॅंडचे स्टार्ट-अप मॉडेल आणि शैक्षणिक मॉडेल अनुसरले जातेय. भारताचेसुद्धा नवीन शैक्षणिक धोरण फिनलॅंडच्या धर्तीवर तयार केले आहे. एकेकाळी या देशाची अर्थव्यवस्था संपली असे वाटत असताना आज कोरोनामध्ये सुद्धा या देशाची अर्थव्यवस्था एकदम मजबूतपणे उभी आहे.
 
गेल्या वर्षभरात लॉकडाउनमध्ये कितीतरी कंपन्या बंद पडल्यात. अचानक माझ्या तरुण मित्रांना, असेच एका रात्रीत नोकरीवरून घरी जायची वेळ आली असेल. भविष्य अंधकारमय वाटत असेल; पण हेही दिवस जातील. पुन्हा इतरांची चाकरी करण्यापेक्षा कधीतरी या नोकिया कर्मचाऱ्यांसारखी जिद्द ठेवा. अंगात ऊर्मी येऊ द्या. संपलेला देश त्या दीड हजार जणांनी पुन्हा उभा केलाय. आपण तर लाखो आहोत. देशभक्ती म्हणजे फक्त देशाचा झेंडा नाचवणे नव्हे, तर फिनिक्‍स पक्ष्यासारखे देशाला शून्यातून उभे करूया. बाबा आमटे यांच्या शब्दांत सांगायचे तर... जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कॅप्टन जिथे असतात, तिथेच बुडता देश वाचविणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. वाट पाहणाऱ्या किनाऱ्यांना व लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्यात - 
मी अजून जहाज सोडलेले नाही!

जमिनीचा वाद मिटविण्यासाठी आईला दिले पेटवून; फिर्यादी सूनच बनली संशयित आराेपी 

तुमच्या फोनमध्ये लवकरच येणार Android चे पुढले वर्जन; प्रायव्हसीची चिंता नाही, जाणून घ्या फिचर्स

मेसेज वाचताच होतो गायब ; इंनस्टाग्राम आणि मेसेंजरची ही आहे कमालीची ट्रीक

आधार कार्ड हरवलंय? नो टेन्शन, डाउनलोड करा तेही फुकट!

CBSE च्या विद्यार्थ्यांनाे! दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ? जाणून घ्या शेवटची तारीख

Edited By : Siddharth Latkar

loading image