स्वातंत्र्यानंतर Ambassador ते Scorpio असा घडला भारतीय गाड्यांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

1947 मध्ये एक लाख लोकांमागे 41 जणांच्या नावावर कारची नोंद होती. तर आता 2020 मध्ये हेच प्रमाण 2 हजार 275 वर पोहोचलं आहे.

नवी दिल्ली - स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक गोष्टी बदलत गेल्या. गेल्या सात दशकात शिक्षण, उद्योग, मनोरंजन या क्षेत्रात अनेक लक्षणीय बदल झाले आहेत. नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नातही वाढ झाली आहे. भारतात गाड्यांची मागणीसुद्धा वाढली आहे. 1947 मध्ये एक लाख लोकांमागे 41 जणांच्या नावावर कारची नोंद होती. तर आता 2020 मध्ये हेच प्रमाण 2 हजार 275 वर पोहोचलं आहे.  स्वातंत्र्यानंतर गाड्यांमध्येही बराच बदल झाला. याकाळात अनेक नव्या गाड्या बाजारात आल्या. मात्र यातील मोजक्या गाड्यांनी भारतीयांना वेड लावलं.

Hindustan Ambassador
भारतात 1958 मध्ये Hindustan Ambassador लाँच झाली. ही कार भारतातील सर्वात लोकप्रिय अशा कारपैकी असून तेव्हाच्या काळात टॉप कारमध्ये तिचा समावेश होता. भारतात ही गाडी लाँच करण्याआधी ब्रिटनमध्ये मॉरिस ऑक्सफर्ड नावाने लाँच करण्यात आलं होतं. Ambassador ला सर्वसामान्यांनी जितकं पसंद केलं त्याहून अधिक आणि वेगळी ओळख दिली ती राजकीय नेत्यांनी. एवढंच काय तर आमदारांपासून ते माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी Ambassador ही एक अधिकृत कार बनली होती. याचे कारणही तसेच होते. कारची केबिन मोठी होती आणि यात जागा जास्त मिळायची. 2014 मध्ये या कारची निर्मिती बंद करण्यात आली. तरीही अजुन रस्त्यावर ही कार धावताना दिसते. 

Maruti 800
देशातील आणखी एका प्रतिष्ठीत कारमध्ये Maruti 800 चा समावेश होतो. भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं. Maruti 800 ही एक एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार असून भारतात लोकप्रिय झाली होती. विक्रीचेही अनेक विक्रम या गाडीने नोंदवले. 1983 मध्ये Maruti 800 लाँच केलं होतं. Maruti Suzuki ने या कारच्या जोरावर भारतात पाय रोवले. देशातील अशी कार होती की ज्याची किंमत कमी होती आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या कारची निर्मीती 2014 मध्ये बंद केली.

Tata Nano
लाखात कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करणारी टाटा नॅनो ही सर्वात स्वस्त कार. लोकांना सर्वात कमी किंमतीत कार देणं या रतन टाटा यांच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक नॅनो कार होती. रतन टाटा यांनी केवळ एक लाख रुपये इतक्या किंमतीत ही कार लाँच केली होती. पहिली मायक्रो हॅचबॅक कार होती ज्यामध्ये 4 लोकांना बसता येत होतं. 2008 मध्ये लाँच केलेली ही जगातील सर्वात स्वस्त कार होती. सुरुवातीला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला मात्र घटत्या विक्रीमुळे कंपनीने 2019 मध्ये निर्मिती बंद केली. 

Reva
मैनी रेवा ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार होती. 2001 मध्ये लाँच करण्यात आलेल्या या कारचे डिझाइन आणि निर्मिती चेतन मैनी यांनी केली होती. या कारला म्हणावी तितकी छाप भारतीय बाजारात उमटवता आली नाही. याचे कारण म्हणजे सिटिंग कपॅसिटी, लहान आकार, किंमत आणि चार्जिंग करण्यासाठी आवश्यक सुविधा कमी प्रमाणात असल्यानं खप होऊ शकला नाही. रेवा नंतर Mahindra ने विकत घेतली.

mahindra Scorpio
भारतातील रस्त्यांवर दिसणाऱ्या गाड्यांमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओचं प्रमाणही जास्त आहे. महिंद्राची सर्वाधिक खपाची एसयुव्ही 2000 मध्ये लाँच करण्यात आली होती. ऑफ रोड वाहतुकीसाठी जबरदस्त असलेल्या या गाडीमध्ये मोठी केबिन असून आकर्षक असं डिझाइन आहे. आतापर्यंत काळानुसार कंपनीने पावले उचलत गाडीच्या डिझाइनसह अनेक बदल केले. आता नव्या जनरेशनचं मॉडेल पुढच्या वर्षी बाजारात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: automobile indian car after independence Ambassador tata nano mahindra scorpio