पक्ष्याच्या रूपातील डायनासोरच्या प्रजातीचा शोध

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

कॅनडातील संशोधकांचा दावा; जीवाश्‍माचा अभ्यासातील निष्कर्ष, सात कोटी वर्षांपूर्वी अस्तित्व

टोरांटो (कॅनडा): महाकाय डायनासोरचे अस्तित्व पृथ्वीवर होते हे आता विविध संशोधनांतून सिद्ध झाले आहे. भौगोलिक, नैसर्गिक बदलांमुळे डायनासोरचे अस्तित्व नष्ट झाले तरी त्यांच्याविषयी जगभरात संशोधन सुरू आहे. यातूनच डायनासोरच्या पक्ष्याच्या रूपातील प्रजातीचा शोध लागल्याचा दावा कॅनडातील संशोधकांनी केला आहे. कॅनडात त्याचे जीवाश्‍म सापडले आहेत.

कॅनडातील संशोधकांचा दावा; जीवाश्‍माचा अभ्यासातील निष्कर्ष, सात कोटी वर्षांपूर्वी अस्तित्व

टोरांटो (कॅनडा): महाकाय डायनासोरचे अस्तित्व पृथ्वीवर होते हे आता विविध संशोधनांतून सिद्ध झाले आहे. भौगोलिक, नैसर्गिक बदलांमुळे डायनासोरचे अस्तित्व नष्ट झाले तरी त्यांच्याविषयी जगभरात संशोधन सुरू आहे. यातूनच डायनासोरच्या पक्ष्याच्या रूपातील प्रजातीचा शोध लागल्याचा दावा कॅनडातील संशोधकांनी केला आहे. कॅनडात त्याचे जीवाश्‍म सापडले आहेत.

जीवाश्‍माच्या संशोधनातून "अर्ल्बटाव्हेंटर' ही डायनोसोरची जात सुमारे सात कोटी दहा लाख वर्षांपूर्वी अर्ल्बटा येथे आढळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्याची उंची मानवाएवढी होती, असे आढळून आले. शास्त्रज्ञांनी या नव्या जातीचे नामकरण "अर्ल्बटाव्हेंटर क्‍यूरी' असे करण्यात आले आहे. कॅनडातील अश्‍मीभूत अवशेषांचे अभ्यासक फिलिप जे. क्‍यूरी यांच्या सन्मानार्थ हे नाव नवीन जातीला दिले आहे.

"अर्ल्बटाव्हेंटर'चे डायनासोरच्या कुळातील "ट्रुडॉन' या प्राण्यांशी साम्य दिसून आले. "ट्रुडॉन'चा पृथ्वीवर वावर सात कोटी 60 लाख वर्षांपूर्वी होता. "अर्ल्बटाव्हेंटर'च्या 50 लाख वर्षांपूर्वी ते अस्तित्वात होते. हे दोन्ही प्रकारचे डायनासोर दोन पायांवर चालत असत. त्यांच्या अंगावर पिसे होती व दोघेही मानवाच्या आकाराचे होते."अर्ल्बटाव्हेंटर'ची हाडे ही "ट्रुडॉन'ची असल्याचे निष्कर्ष अश्‍मीभूत अवशेष तज्ज्ञांनी आधी काढला होता; पण नवीन संशोधनात दोन्ही डायनासोरच्या कवटीतील हाडांची तुलना करण्यात आली. यात "ट्रुडॉन'च्या मजबूत कवटीपेक्षा "अर्ल्बटाव्हेंटर'ची हाडे लहान असल्याचे निदर्शनास आले.

""छोटी पिसे असलेल्या या डायनासोरची नाजूक हाडे अतिशय दुर्मिळ आहेत. सुदैवाने आमच्याकडे कवटीतील महत्त्वाचा तुकडा असल्याने "अर्ल्बटाव्हेंटर'ही डायनासोरची नवी जात असल्याचा निष्कर्षाप्रत आम्ही पोचू शकलो,'' असे रॉयल ऑन्टॅरियो संग्रहालयाचे प्रमुख संशोधक डेव्हिड इव्हास यांनी सांगितले. भविष्यात "अर्ल्बटाव्हेंटर'चा संपूर्ण सांगडा सापडावा, असा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे त्याच्या अभ्यासातून या आकर्षक प्राण्याबद्दल आणखी माहिती मिळू शकेल, असेही ते म्हणाले. त्यांचा संशोधनात्मक निबंध "कॅनेडियन जरनल ऑफ अर्थ सायन्सेस' या मासिकात प्रसिद्ध झाला आहे.

अभ्यासातील निष्कर्ष
- "अर्ल्बटाव्हेंटर क्‍यूरी' किंवा क्‍यूरिज अर्ल्बटा असे नामकरण
- निळ्या व मोठी पिसे हे वैशिष्ट
- कॅनडात सात कोटी 10 लाख वर्षांपूर्वी अस्तित्व
-रेड डिअर रिव्हर खोऱ्यात त्याच्या जीवाश्‍माचा शोध
- "अर्ल्बटाव्हेंटर'चा आकार मानवाएवढा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: canada news Bird species of dinosaurs

टॅग्स