स्वस्त, पर्यावरणपूरक सौरघटाची माैनी विद्यापीठात निर्मिती

धनाजी आरडे
सोमवार, 13 मे 2019

सिलिकॉन सौरघटाला पर्याय म्हणून अत्यंत स्वस्त व प्रर्यावरणपूरक सौरघट निर्मिती पद्धत शोधली आहे. या संशोधनाचे पेटंट या संशोधकांना प्राप्त झाले. सदर शोध नुकताच भारतीय पेटंट कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. 
मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयातील डॉ. शरदराव व्हनाळकर यांनी तांबे, जस्त, टिन व गंधक (CZTS) यांचे नॅनोकण मिश्रणातून सौरघट निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

गारगोटी - ऊर्जा...एक अशी बाब जी आधुनिक जगासाठी अत्यावश्‍यक आहे. त्यातही सौरऊर्जा हा सर्वांत स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जास्रोत. तरीही या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर किफायतशीर मार्गाने करणे सहज शक्‍य होत नाही. जगात सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने संशोधन होत आहे. जगभरात सिलिकॉनपासून सौरघट तयार होतात, पण सिलिकॉन सौरघट हे महागही आहेत, सोबत ते पर्यावरणपूरक नाहीत. पण, आता यावर पर्यायी व अतिशय उपयुक्त आणि स्वस्त सौरघट तयार होतोय आणि हा सौरघट तयार केलाय गारगोटीच्या मौनी विद्यापीठातील युवा संशोधक डॉ. शरदराव आनंदराव व्हनाळकर, डॉ. प्रमोद शंकरराव पाटील (शिवाजी विद्यापीठ) व डॉ. जीन ह्योक किम (चोन्नाम राष्ट्रीय विद्यापीठ, दक्षिण कोरिया) यांनी.

सिलिकॉन सौरघटाला पर्याय म्हणून अत्यंत स्वस्त व प्रर्यावरणपूरक सौरघट निर्मिती पद्धत शोधली आहे. या संशोधनाचे पेटंट या संशोधकांना प्राप्त झाले. सदर शोध नुकताच भारतीय पेटंट कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. 
मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयातील डॉ. शरदराव व्हनाळकर यांनी तांबे, जस्त, टिन व गंधक (CZTS) यांचे नॅनोकण मिश्रणातून सौरघट निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आजतागायत असे नॅनोकण सौरघट तयार करण्यासाठी जगभरातील संशोधक हायड्रोजन, इथिलीन डायअमाईन आदी अत्यंत विषारी व स्फोटक द्रव पदार्थ वापरत होते. पण, डॉ. व्हनाळकर, डॉ. पाटील व डॉ. किम यांनी नवीन पद्धत शोधली असून, ज्यात फक्त पाण्याचा द्रव पदार्थ म्हणून उपयोग केला आहे. 

हे संशोधन पूर्ण करण्यासाठी या संशोधकांना दोन वर्षांहून जास्त कालावधी लागला. त्यांनी हे संशोधन दक्षिण कोरियातील चोन्नाम राष्ट्रीय विद्यापीठ, अमेरिकेतील आईवा विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ येथे पूर्ण केले आहे. हे संशोधन डॉ. पाटील व डॉ. किम यांच्या मार्गदर्शनखाली पूर्ण करण्यात आले. संशोधन कार्यासाठी त्यांना मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष आशिष कोरगावकर व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. डॉ. व्हनाळकर यांनी केलेल्या या उपयुक्त व नव्या संशोधनाला नुकतीच भारतीय पेटंट संस्थेने मान्यता दिली आहे. या शोधामुळे मौनी विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.

असा झाला सौरघट तयार
CZTS सौरघट तयार करण्यासाठी प्रथम गंधकयुक्त तांबे, जस्त व टिन यांच्या वेगवेगळ्या भुकटीपासून संयुक्त तांबे-जस्त-टिन-गंधक (CZTS) यांचे नॅनोकण तयार केले. असे नॅनोकण तयार करण्यासाठी जलविद्युत पद्धतीचा उपयोग केला असून, प्रथमच हे पदार्थ पाण्यात विरघळले गेले. १८० डिग्री सेल्सियस तापमानाला सदर पदार्थ २४ तासांसाठी तापविले गेले. प्रक्रियेनंतर तयार नॅनोकणयुक्त पावडर सुवाहक काचेच्या पट्टीवर कोट/कल्हीत केली व शेवटी या सर्वांवर केडमियम-सलफाईड व झिंक-ऑक्‍साइडचे थर चढवून सौरघट तयार केला गेला. असा सौरघट तयार करणे स्वस्त आहे. या पद्धतीपासून सौरघट तयार करणे किफायतशीर असल्याचा दावा डॉ. व्हनाळकर यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheap, eco-friendly solar eclipse created at Mouni University