esakal | ब्रह्मांडातील अचूक घड्याळावर शंकांचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

शास्त्रज्ञांची निरीक्षणे

ब्रह्मांडातील अचूक घड्याळावर शंकांचे सावट

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : ब्रह्मांडातील सर्वांत अचूक घड्याळ म्हणून पल्सारकडे (मृततारा) पाहिले जाते. पल्सारची स्वतःभोवती फिरण्याची गती विश्वात सर्वात अचूक समजली जाते. म्हणूनच त्यांना अवकाशातील दीपस्तंभ किंवा घड्याळ म्हणून संबोधले जाते. परंतु, भारतीय शास्त्रज्ञांनी नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (युजीएमआरटी) साहाय्याने मिलिसेकंद पल्सार संबंधी काही अनपेक्षित निरीक्षणे नोंदविली आहे. ज्यामुळे ब्रह्मांडातील या अचूक घड्याळाच्या अचूकतेवरच शंका घेण्यास जागा मिळाली आहे.

हेही वाचा: ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा!; पाहा व्हिडिओ

पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रासह (एनसीआरए) देशभरातील विविध खगोलशास्त्रज्ञांच्या इंडियन टायमिंग पल्सार अरे (आयएनपीटीए) या गटाने हे संशोधन केले आहे. मंथली नोटिसेस फॉर रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी लेटर्स या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत यासंबंधीचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. नॅनोहर्ट्झ गुरुत्वीय लहरींचे संशोधन करणाऱ्या ४० संशोधकांच्या गटाने एका मिलीसेकंद पल्सारचे सातत्याने निरीक्षणे घेतल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

पल्सार म्हणजे काय?

मृत ताऱ्याची अवस्था. रेडिओ तरंगांचे ठराविक कालखंडाने स्पंदांच्या स्वरूपात उत्सर्जन करणाऱ्‍या ताऱ्‍याला पल्सार म्हणतात. सर्व पल्सार चुंबकीय न्यूट्रॉन तारे असतात जे विद्युतचुंबकीय प्रारणे उत्सर्जित करतात. शास्त्रज्ञांनी ज्या रेडिओ पल्सारची निरीक्षणे घेतली आहे तो मिलीसेकंद पल्सार आहे. म्हणजे ज्यातून एका सेकंदाला एक हजार स्पंदने बाहेर पडतात.

हेही वाचा: वर्ण भेदभाव प्रकरणी फेसबुक पुन्हा अडचणीत! मागितली माफी

संशोधन महत्त्वपूर्ण का?

सैद्धांतिक मांडणीनूसार पल्सार ताऱ्यातून बाहेर पडणारी स्पंदने अचूक असतात. म्हणजे ते जर एका सेकंदाला एक हजार स्पंदने दर्शवीत असतील तर अब्जावधी वर्षांपर्यंत त्यात काहीच बदल अपेक्षीत नाही. म्हणूनच ते विश्वातील अचूक घड्याळ मानले जातात. मात्र भारतीय शास्त्रज्ञांनी शोधलेल्या पल्सारमधील स्पदनांत बदल दिसला. म्हणजेच एका सेकंदाला एक हजार ऐवजी कमी-जास्त स्पंदनांची निरीक्षणे मिळाली. याचाच अर्थ आजवर अचूक मानले जाणारे हे वैश्विक घड्याळासंबंधी आता साशंकता निर्माण झाली आहे. निश्चितच अधिकच्या संशोधनानंतर हा बदल का निर्माण झाला, यावर प्रकाश पडेल.

या पल्सारची निरीक्षणे ः

पीएसआरजे १७१३+०७४७ नावाच्या कालमापनासाठी विश्वसनीय पल्सारची निरीक्षणे जीएमआरटीच्या साहाय्याने घेण्यात आली. एप्रिल-मे २०२१ दरम्यानच्या निरीक्षणामध्ये या महत्त्वपूर्ण बदलांची निरीक्षणे घेण्यात आली.

loading image
go to top