वीज बचत करणारे डिव्हाईस, आहे तरी काय ?

वीज बचत करणारे डिव्हाईस, आहे तरी काय ?

विद्युत ऊर्जेची निर्मिती ही मानवी इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ऊर्जेच्या या रुपाने मानवी प्रगतीला विद्युत वेग दिला. उद्योग सार्वत्रिक झाले आणि त्यांचा विस्तारही वाढला. त्यामुळे उत्पादकता आणि रोजगार यामध्ये वाढ झाली. सामान्य माणसाचे जीवन सुखकर होण्यामध्ये या विद्युत क्रांतीचा फार मोठा वाटा आहे; पण कालांतराने विजेची मागणी वाढली. उत्पादनाला मर्यादा आल्या. त्यामुळे विजेची बचत करण्याचा विचार होऊ लागला. घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक, कृषी या प्रत्येक क्षेत्रात विजेची बचत व्हावी यासाठी विविध उपाययोजना केल्या गेल्या.  याबाबत कोल्हापूरच्या यश पंडित याने एक डिव्हाईस बनविले आहे.

उद्योगासाठी या वर्षी ३७,०५९ दशलक्ष युनिट इतकी वीज लागली. म्हणजे विजेच्या एकूण उत्पादनापैकी ३६.८ टक्के वीज उद्योगाक्षेत्रासाठी वापरली गेली. त्यामुळे या क्षेत्रातील अतिरिक्त विजेचा वापर कमी करण्याकडे उद्योजक आणि महावितरण यांचा कल आहे. यासाठी विजेचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्‍यक असून प्रत्येक यंत्रागणिक विजेचा वापर किती हे शोधण्याची गरज आता उद्योजकांना वाटू लागली. 

विजेचा वापर किती हे शोधावे म्हणूनच यामुळे उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रांना सबमीटर बसवण्यात आले. जेणे करून विजेचा व्यय हा यंत्रनिहाय समजावा; पण अखेर याची नोंद घेण्यासाठीही एका माणसाची नेमणूक करावी लागते. ही व्यक्ती सबमीटरच्या नोंदी ठेवण्याचे काम करते; पण या नोंदीमध्ये मानवी त्रुटी राहतात. शिवाय प्रत्येक यंत्र किती वीज वापरते या माहितीचे स्वतंत्र विश्‍लेषण करावे लागते. त्यामुळे कोणते यंत्र किती काळ सुरू होते, त्या यंत्राने किती वीज वापरली, हे पाहण्यासाठी एका व्यक्तीला या नोंदीचे विश्‍लेषण (डेटा ॲनॅलिसिस) करावे लागते. ही सर्वच कामे उद्योजकांसाठी अतिरिक्त, अनउत्पादक आणि खर्चिक असतात. पर्यायाने काही काळानंतर हे सर्वच करणे बंद होते. यासाठी जी स्वयंचलित यंत्रणा आहे ती अतिशय खर्चिक असल्याने मध्यम, लघुउद्योगांना ते परवडत नाही. त्यामुळे विजेचा वापर नेमका किती झाला हे समजत नाही. त्यामुळे वीज बचतीचा आराखडा या उद्योगांना तयार करता येत नाही. 

या समस्येवर अभियांत्रिकीचा विद्यार्थी यश सूर्यकांत पंडित याने नामी उपाय शोधला आहे. त्याने एक असे डिव्हाईस बनवले आहे, ज्यातून उद्योगांमध्ये उपयोगात येणाऱ्या यंत्रांच्या विजेच्या वापराची माहिती अचूकपणे कळते. त्यासाठी कोणीही माणूस नियुक्त करावा लागत नाही. विशेष म्हणजे त्या उद्योजकाला याबाबतची विश्‍लेषण केलेली सर्व माहिती मोबाईलवर दिसू शकते. यामध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या तंत्राचा वापर केला गेला आहे. या अंतर्गत एक छोटे डिव्हाईस यंत्राला असणाऱ्या सबमिटरला बसवले आहे. हे डिव्हाईस प्रत्येक मशीन सुरू झालेल्या क्षणापासून प्रत्येक मिनिटाला रीडिंग घेते. घेतलेले रीडिंग एका ‘क्‍लाऊड’ मध्ये साठवले जाते. त्यानंतर त्या माहितीचे पृथक्‍करण करून (डेटा ॲनॅलिसिस) ती माहिती वेबसाईटवर दिली जाते. त्यामुळे कारखान्यातील प्रत्येक यंत्र एका मिनिटाला किती वीज वापरते याची इत्थंभूत माहिती त्या उद्योजकाला क्षणाक्षणाला बेवसाईटवर पाहता येते. याचे अनेक फायदे आहेत. अचूक माहिती, माहितीचे विश्‍लेषण आणि सर्व गोष्टी स्वयंचलित पद्धतीने होतात. त्यामुळे विजेच्या वापराची अचूक माहिती कमी वेळात मिळते. याचा उपयोग वीज बचत करण्याचा आराखडा बनवण्यासाठी करण्यात येतो. सध्या उद्यमनगर येथील एका कारखान्यात हे यंत्र बसवले असून ते चांगले काम करते आहे. 

ते संपूर्ण यश याने स्वतः बनवले आहे. यातील डिव्हाईसची निर्मिती त्याची. त्यासाठीचा प्रिंटेड सर्किट बोर्डही त्याने स्वतः बनवला आहे, तर क्‍लाऊडही त्याने उपलब्ध केला आहे. वेबसाईटही त्यानेच बनवली आहे. या सर्व तंत्राविषयी यश सांगतो, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्राचा वापर अनेक ठिकाणी होतो. त्यातून काम कमी वेळेत, अचूक आणि गुणवत्तापूर्ण होते. यावर आणखी संशोधन सुरू आहे; मात्र भविष्यात याच तंत्राचा वापर करून अनेक गोष्टी करणे शक्‍य होणार आहे.

यश हा मुळातच संशोधनात रमणारा आहे. शाळेत असताना त्याने लेसर लाईटचा उपयोग करून इंटरनेटशिवाय संदेशाची देवाण घेवाण करणारे उपकरण बनवले होते. त्याने छत्रपती शाहू हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधून ११ वी आणि १२ वी केले. सध्या तो गोव्याच्या बिट्‌स पिलानी के.के.बिर्ला कॅम्पस येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून तो शेवटच्या वर्षात आहे. आपली आवड लक्षात घेऊन त्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्स्ट्रुमेंटेशन या विषयाची निवड केली. त्याचे हे संशोधन लघू आणि मध्यम उद्योगांसाठी उपयुक्त आहे. कारण एका अर्थाने ते माहितीच्या माध्यमातून विजेच्या बचतीचा मंत्र देणारे तंत्र आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये मूलभूत संशोधन करण्याची इच्छा आहे. या माध्यमातून आपण विविध क्षेत्रांतील अनेक प्रश्‍न सोडवू शकतो. स्टार्टअपमुळे तरुणांना नवी क्षितिजे खुली झाली आहेत. अशा अनेक होतकरू तरुणांना त्यांच्या व्यवसायात सहाय्यभूत ठरेल असे तंत्र विकसित करण्याची इच्छा आहे.
- यश पंडित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com