मेंदूतील विचार थेट संगणकावर! 

महेश बर्दापूरकर 
गुरुवार, 30 मार्च 2017

"मॅट्रिक्‍स' या चित्रपट मालिकेत तुम्ही मनातील विचार संगणकावर उतरविण्याचे किंवा एकाच्या डोक्‍यातून दुसऱ्याच्या डोक्‍यात पोचवण्याचे प्रयोग पाहिले असतील. चित्रपटातील ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधकांनी आता कंबर कसली असून, इलॉन मस्क यांच्या "न्यूरालिंक' या कंपनीनं मानवी विचार थेट संगणकावर डाउनलोड करणारी "न्यूरल लेस' प्रणाली विकसित केल्याची घोषणा केली आहे.... 

"मॅट्रिक्‍स' या चित्रपट मालिकेत तुम्ही मनातील विचार संगणकावर उतरविण्याचे किंवा एकाच्या डोक्‍यातून दुसऱ्याच्या डोक्‍यात पोचवण्याचे प्रयोग पाहिले असतील. चित्रपटातील ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संशोधकांनी आता कंबर कसली असून, इलॉन मस्क यांच्या "न्यूरालिंक' या कंपनीनं मानवी विचार थेट संगणकावर डाउनलोड करणारी "न्यूरल लेस' प्रणाली विकसित केल्याची घोषणा केली आहे.... 
मानवी मेंदू प्रचंड मोठं गूढ असून, ते पूर्णपणे उलगडण्यास संशोधकांना अद्यापही संपूर्ण यश आलेलं नाही. शरीरावर नियंत्रण ठेवणारा, भावना उत्पन्न करणारा आणि लक्षात ठेवून हवं तेव्हा आठवण्याची क्रिया पूर्ण करणारा मेंदू मोठी देणगीच आहे. विचार करणं आणि त्याबरहुकूम काम करणं हे मानवाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य व त्यामुळंच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. मेंदू संगणकाला जोडून त्यातील विचार संगणकावर अपलोड किंवा गरज पडल्यावर डाउनलोड करण्याची भन्नाट कल्पना इलॉन मस्क या महत्त्वाकांक्षी संशोधकानं विकसित केली असून, त्यासाठी "न्यूरालिंक' या स्टार्ट अपची स्थापनाही केली आहे. 
"न्यूरालिंक'चा उद्देश मानवी मेंदू संगणकाला जोडण्यासाठी प्रयत्न करणं, हाच आहे. त्यासाठी कंपनी "न्यूरल लेस' या तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे. "न्यूरल लेस' हे छोट्या आकाराचे इलेक्‍ट्रोड असून, ते मानवी मेंदूमध्ये बसविण्यात येतील. त्याद्वारे मानवी मेंदूतील विचार संगणकावर अपलोड किंवा डाउनलोड करणे हा कंपनीचा अंतिम उद्देश आहे. मस्क यांनी अशा प्रकारची कंपनी स्थापन करण्याचा उद्देश याआधी अनेकदा बोलून दाखविला होता. ""आपण पुढील काही वर्षांतच जैविक आणि डिजिटल बुद्धिमत्तेचा मिलाफ पाहणार आहोत. या प्रकल्पांतर्गत तुमचा मेंदू व त्यातून बाहेर पडणाऱ्या विचारांना तुमच्याच डिजिटल आवृत्तीशी जोडलं जाईल. कंपनीच्या यशाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही,'' असं मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये जाहीर केलं होतं. "न्यूरालिंक'बद्दल मस्क यांनी स्वतः ट्विट केलं असून, या प्रकल्पाद्वारे मानवी मेंदूची क्षमता वाढविण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला आहे. 
या प्रकल्पामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणार असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कायमच पुरस्कार केला असून, त्यांनी स्थापन केलेल्या "ना नफा, ना तोटा' तत्त्वावरील कंपन्यांद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवाच्या प्रगतीसाठी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. ""आपण "डिजिटल सुपर इंटेलिजन्स'सारखी मानवी क्षमतांना सर्व बाबतीत मागं टाकणारी व्यवस्था निर्माण केल्यास तिचं स्वागतच करायला पाहिजे. "सायबोर्ग'सारखी प्रणाली आपण याधीच निर्माण केली आहे. यंत्रमानवासारख्या मशिनच्या आधिपत्याखाली जाऊन "पाळीव मांजर' बनण्यापेक्षा "न्यूरल लेसिंग' या तंत्राद्वारे आपणही आपली मेंदूची शक्ती वाढवून यंत्रमानवांच्या एक पाऊल पुढं राहिलं पाहिजे. भविष्यात हातानं टाइप करून माहिती संगणकाला देण्यापेक्षा मेंदूतील विचार थेट संगणकात डाउनलोड करणंच फायद्याचं ठरणार आहे. "न्यूरल लेस' मेंदूमध्ये नक्की कशी बसवणार याबद्दल आमचं अधिक संशोधन सुरू आहे,'' असं मस्क यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. 

Web Title: Elon Musk creates new firm to make Matrix-style 'neural lace' computers that can be implanted into the BRAIN