esakal | सावधान! Fake सिस्टिम अपडेटचं जाळं; अँड्रॉइड युजर्सचा डेटा होतोय चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

hacker

 स्मार्टफोन युजर्सना सतत काही ना काही अपडेट येत असतात. आता अशाच अपडेटचा वापर करून हॅकर्सकडून युजर्सना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे

सावधान! Fake सिस्टिम अपडेटचं जाळं; अँड्रॉइड युजर्सचा डेटा होतोय चोरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - स्मार्टफोन युजर्सना सतत काही ना काही अपडेट येत असतात. आता अशाच अपडेटचा वापर करून हॅकर्सकडून युजर्सना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँड्रॉइड युजर्सवर पुन्हा एकदा मेलवेअर अटॅक केला जात आहे. यावेळी फेक सिस्टिम अपडेटच्या माध्यमातून युजर्सना फसवलं जात आहे. युजर्स नेहमीप्रमाणे सिस्टिम अपडेट समजून मेलवेअर डिव्हाइसमध्ये डाउनलोड करतात. यानंतर हॅकर्सला युजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटाचा अॅक्सेस मिळतो. यामध्ये Whatsapp आणि टेलिग्राम यांतील कंटेंटचाही समावेश आहे. तसंच युजर्सचा ब्राउजर, त्यातील बुकमार्क, गॅलरीमधील इमेजेस हेसुद्धा मेलवेअरच्या माध्यमातून अॅक्सेस केलं जातं. 

सिक्यूरिटी रिसर्च फर्म Zimperium ने दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉइड युजर्सना मेलवेअर इन्स्टॉल करण्यासाठी सिस्टिम नोटिफिकेशन देते. सिस्टिमम नोटिफिकेशन नेहमी येणाऱ्या नोटिफिकेशनसारखंच असतं. यामुळे युजर्सना सुरुवातीला ते लक्षात येत नाही. अपडेट नोटिफिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर युजरच्या डिव्हाइसमध्ये मेलवेअरसुद्धा इन्स्टॉल होतात.

हे वाचा - Google Maps दाखवणार ईको-फ्रैंडली रस्ते, लवकरच नवे फिचर

मेलवेअर अपडेट अॅडव्हान्स तयार करण्यात आला आहे. यामुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये कोणतीही माहिती येताच रिअल टाइममध्ये स्मार्टफोनमधून माहिती गोळा करते आणि हॅकर्सकडे पाठवते. मेलवेअर स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल होते. त्यानंतर सर्व माहिती कमांड सेंटरला पाठवत राहते. यामुळे हॅकर्सला युजर्सचा अपडेटेड डेटा नेहमीच मिळत राहतो. या मेलवेअरने आतापर्यंत किती स्मार्टफोनमध्ये शिरकाव केला आहे हे समोर आलेलं नाही. 

सिस्टिम अपडेट गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसते. इन्स्टॉल करण्यासाठी युजरला त्यावर मॅन्युअली क्लिक करावं लागलं. टेक्नोसॅव्ही असलेल्यांसाठी नोटिफिकेशनमधील फरक ओळखणं सोपं असतं. मात्र इतरांची फसवणूक होऊ शकते. अँड्रॉइड सिस्टिममध्ये अनोळखी अॅप्सचे इन्स्टॉलेशन हे पहिल्यापासूनच ऑफ असतं. मात्र अनेकदा इतरांकडून अॅप घेताना ते ऑन करावं लागतं. अशावेळी जर ते ऑन केलं असेल तर मेलवेअर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सहज प्रवेश करू शकतो.

टेक्नॉलॉजी विषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मेलवेअरपासून वाचायचं असेल तर अॅप नेहमी गूगल प्ले स्टोअरवरूनच डाऊनलोड करा. तसंच सिस्टिम अपडेटचं नोटिफिकेशन कसं आलं आहे ते पाहा. एखाद्या थर्ड पार्टी अॅपकडून जर अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितलं जात असेल तर ते करू नका. कोणत्याही लिंक किंवा साइटवरून अपडेट करणं टाळा. 
 

loading image